‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणीच्या आरोपपत्रातून अर्णव गोस्वामी आणि दासगुप्ता यांचे अनेक आक्षेपार्ह संवाद उघड

अर्णब गोस्वामी यांना एअर स्ट्राईक आणि पुलवामा आक्रमणाची कल्पना असल्याचे उघड

सौजन्य : ZEE NEWS

मुंबई – रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल (‘बार्क’)चे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यात ‘व्हॉट्स अप चॅट’द्वारे झालेले अत्यंत आक्षेपार्ह संवाद ‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी ३ सहस्र ६०० पानांच्या पुरवणी आरोपपत्रातून पुढे आले आहेत. हे संवाद सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. गुन्हे अन्वेषण शाखेने प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात ५०० पाने गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्या ‘चॅट’चीच आहेत. या संवादातून गोस्वामी यांना पुलवामा आक्रमण आणि एअर स्ट्राईक याची पूर्वकल्पना असल्याचे पुढे येत आहे. केंद्रातील काही अधिकार्‍यांसमवेत संबंध असल्याचेही या संवादातून स्पष्ट होत आहे.

(सौजन्य : HW News English)

१. गोस्वामी यांनी दासगुप्ता यांना काहीतरी मोठे घडणार असल्याचे २३ फेब्रुवारी २०१९ ला सांगितले आणि २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राईक झाल्यावर गुप्ता यांनी २७ फ्रबु्रवारीला ‘एअर स्ट्राईक हीच मोठी घटना ना’, असे विचारले. यावरून त्यांना यांची कल्पना असल्याचे लक्षात येत आहे.

२. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तत्कालिन प्रधान सचिव न्रिपेंद्र मिश्रा यांची या पदावरून अन्य ठिकाणी नियुक्ती केली जाईल’, ‘इंडिया टीव्हीच्या रजत शर्मा यांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करावे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील माजी मंत्र्याने केलेली मध्यस्थी’, ‘रिपब्लिक वाहिनीविषयी आलेल्या तक्रारी माहिती व प्रसारण मंत्रायालय कशा केराच्या टोपलीत फेकेल’, ‘स्मृती इराणी यांच्याकडे माहिती प्रसारण मंत्रिपदाचे दायित्व सोपवले जाईल’ आदी विषयांवरील संवाद यातून पुढे आले आहेत.

पुलवामा आक्रमण आणि बालाकोट आक्रमण याविषयीही गोस्वामी यांनी दासगुप्ता यांच्यासमवेत केलेले संवाद यात आहेत. तसेच १४ फेब्रुवारीला पुलवामा आक्रमणाच्या वेळी केवळ रिपब्लिक वाहिनीचे लोकच तिथे असल्याचा दावा गोस्वामी यांनी केला होता. त्यामुळे ‘त्यांना या आक्रमणाचीही माहिती होती का ?’, अशी चर्चा माध्यमांतून पुढे येत आहे. त्याविषयी त्यांच्यावर सामाजिक माध्यमातून टीकेचा भडीमार झाला आहे.