ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक बिस्वजीत चटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ इयर’ पुरस्कार घोषित
पणजी – सर्व चित्रपट रसिक, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आदी वाट पहात असलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पणजी, गोवा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात गोव्यातील लोकनृत्ये आणि संगीत यांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला मर्यादित संख्येने मान्यवर उपस्थित होते, तर इतरांसाठी हा कार्यक्रम ‘हायब्रीड’ पद्धतीने प्रसारित करण्यात आला.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यासपिठावर प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह कर्नाटकातील कन्नड चित्रपट निर्माते सुदीप संजीव उपस्थित होते. त्यांच्यासमवेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; अभिनेत्री, लेखिका आणि निर्मात्या टिस्का चोप्रा आणि प्रियदर्शन नायर हेही उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधतांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावरून महोत्सवासाठी झालेल्या ६०० प्रवेशनोंदी आणि देशातील १९० प्रवेशनोंदी यातून या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे महत्त्व दिसून येते.’’
(सौजन्य : ANI News)
या वेळी केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी बांगलादेशचे शेख मुजीबूर रेहमान यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त दोन्ही देशांकडून संयुक्तरित्या ‘बांगाबंधू’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक बिस्वजीत चॅटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही जावडेकर यांनी घोषित केले. ते पुढे म्हणाले, ‘‘इतर देशांच्या तुलनेत भारतात चित्रीकरणासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे आहेत. त्यामुळे आपण ‘शूट इन इंडिया’ला प्रोत्साहन दिले पाहिजे. ५१ व्या चित्रपट महोत्सवाचे ७ पडद्यांवर प्रसारण होईल आणि लाखो भ्रमणभाष अन् दूरचित्रवाहिन्या यांद्वारे त्याचे प्रसारण जगभरात होईल.’’
याप्रसंगी सुदीप संजीव म्हणाले, ‘‘साथीचा रोग देशभर पसरतो, त्याप्रमाणे चित्रपटाचे लोण देशभर पसरू दे. चित्रपट एका स्थानावर बसून तुम्हाला जगभरातील माहिती देतो आणि जगभरातील संस्कृतीशी जवळीक साधतो.’’ (चित्रपट जनतेवर चांगले संस्कार करणारे असतील, तरच हे शक्य आहे. विशिष्ट समाजाचा, श्रद्धास्थानांचा द्वेष करणारे, आदी चित्रपट हे चित्रपटसृष्टीला लागलेला कलंक असल्याने त्याविरोधात चित्रपट निर्मात्यांनी मोहीम उघडावी ! – संपादक) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या भाषणात भारतीय आणि जगभरातील चित्रपट निर्मात्यांना ‘गोवा हे चित्रपटासाठीचे स्थळ बनवा’, असे आवाहन केले.
भारतातील बांगलादेशचे राजदूत महंमद इम्रान हेही या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘बांगलादेश हे या वर्षीच्या महोत्सवाचे आकर्षण आहे. निर्मिती आणि कल्पकता यांसाठी बांगलादेशमधील चित्रपट निर्माते ओळखले जात असले, तरी शेजारील देशांसमवेत त्यांचे असलेले खोलवरचे संबंध आणि ऐतिहासिक बंधन यांचीही ते साक्ष देतात. कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात हा महोत्सव आयोजित केल्याविषयी मी भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अभिनंदन करतो. ’’
इटलीचे सिनेमॅटोग्राफर व्हिट्टोरियो स्टोरारो यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित
या वेळी इटलीचे सिनेमॅटोग्राफर व्हिट्टोरियो स्टोरारो यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला. एका व्हिडिओद्वारे स्टोरारो यांनी त्यांच्या कारकीर्दीची नोंद घेतल्याविषयी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आभार मानले.