मुंबई – कोरोनाची लस घेतली, तरी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बी.के.सी. येथे केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोनाच्या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात मोलाचे सहकार्य देणारे टास्क फोर्स गटामधील आधुनिक वैद्य हे आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधार आहेत. संकट अजूनही टळलेले नसल्याने जनतेने सावध राहिले पाहिजे. सध्या आपल्याकडे लस आली असली, तरी ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस आणि मासांचा कालावधी लागणार असून, त्याचा प्रभावही किती दिवसांसाठी रहाणार हेसुद्धा येत्या दिवसांतच स्पष्ट होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळाली असली, तरीही सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावर असणारा मास्क असून मास्कला अंतर देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.