वर्षा राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले

वर्षा राऊत

मुंबई – खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी पी.एम्.सी. बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज परत केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे पैसे परत केले आहेत.

वर्षा राऊत यांनी एका नातलगाच्या माध्यमातून सक्तवसुली संचालनालयाला काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले कर्ज परत केल्याचीही कागदपत्रे आहेत. संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी हे पैसे परत केले आहेत. वर्षा राऊत या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.

पी.एम्.सी. बँक आणि एच्.डी.आय.एल्. कर्ज घोटाळ्याची चौकशी करणार्‍या ईडीच्या पथकाने नोव्हेंबर मासात वर्षा राऊत यांना चार वेळा समन्स बजावले होते. वर्षा राऊत यांनी पाठवलेल्या कागदपत्रांची पडताळणी चालू असून आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.