केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना उपचारासाठी गोव्याबाहेर नेण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

देहली येथील ‘एम्स’च्या पथकाने ‘गोमेकॉ’ला दिली भेट, उपचारावर व्यक्त केले समाधान

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक

पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – देहली येथील ‘ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’च्या (एम्स) पथकाने १३ जानेवारी या दिवशी सकाळी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला (गोमेकॉ)ला भेट देऊन केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर चालू असलेल्या उपचाराचा आढावा घेतला. याविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘श्रीपाद नाईक यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे आणि त्यांना उपचारासाठी गोव्याबाहेर नेण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक सध्या बोलू शकत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना पुढील २४ घंटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांचा ‘व्हेंटिलेटर सपोर्ट’ही काढण्यात आला आहे आणि त्यांना ‘हाय फ्लो नेसल ऑक्सीजन’वर ठेवण्यात आले आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर ‘गोमेकॉ’त चांगले उपचार चालू असल्याने त्यांना उपचारार्थ अन्यत्र हालवण्याची आवश्यकता नसल्याचे ‘एम्स्’च्या पथकाने सांगितले आहे.’’

श्रीपाद नाईक यांना पुढील १० ते १५ दिवसांत घरी जाता येईल ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ

डॉ. शिवानंद बांदेकर

पणजी – केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर अपघात झाल्याच्या रात्री ३ मोठ्या स्वरूपाच्या आणि एक लहान स्वरूपाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका नाही. ते सध्या गुंगीत आहेत आणि उद्या ते शुद्धीवर येतील. पुढील १० ते १५ दिवसांत ते घरी जाऊ शकतील. त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी ३ मासांचा अवधी लागेल, अशी माहिती ‘गोमेकॉ’चे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या पार्थिवावर आडपई येथे होणार आज दुपारी अंत्यसंस्कार

पणजी – केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी सौ. विजया श्रीपाद नाईक यांच्या पार्थिवावर आडपई, फोंडा येथे १४ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सौ. विजया नाईक यांचे पार्थिव १४ जानेवारी या दिवशी सकाळी ८ ते ९ या काळात त्यांच्या सांपेद्र, रायबंदर येथील निवासस्थानी आणि नंतर सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजता या कालावधीत त्यांच्या आडपई या मूळ निवासस्थानी लोकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.