शेळ-मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्प रहित करा ! – विश्‍वजित राणे

  • प्रकल्पाला असलेला पाठिंबा आरोग्यमंत्र्यांनी काढून घेतला

  • आंदोलकांना मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

आमदार विश्‍वजित राणे

पणजी, १२ जानेवारी (वार्ता.) – आरोग्यमंत्री आणि सत्तरी तालुक्याचे आमदार विश्‍वजित राणे यांनी शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाला असलेला त्यांचा पाठिंबा काढून हा प्रकल्प रहित करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांपुढे त्यांनी नमते घेतल्याने आंदोलकांनी मिळवलेला हा विजय आहे. विश्‍वजित राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांना पत्र पाठवून आय.आय.टी. प्रकल्प सत्तरी तालुक्यातून अन्यत्र हालवावा, अशी विनंती केली आहे.

(सौजन्य : Prudent Media Goa)

एका चित्रफितीद्वारे त्यांनी दिलेल्या विधानामध्ये म्हटले आहे, ‘‘जर लोकांना सत्तरीमध्ये हा प्रकल्प नको असेल, तर मलाही तो नको आहे. जोपर्यंत मी या ठिकाणी आमदार आहे, तोपर्यंत हा प्रकल्प सत्तरीमध्ये येणार नाही, असे मी तुम्हाला वचन देतो. ज्या पोलीस अधिकार्‍यांनी आंदोलकांना मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच आंदोलकांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात नोंद केलेल्या तक्रारी मागे घेण्यात याव्यात, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे.’’

‘जेव्हा पोलीस गावात गेले, तेव्हापासून ही समस्या चालू झाली. कोणताही प्रकल्प बळजोरीने लोकांवर लादता येत नाही’, असे राणे पुढे म्हणाले. (हे आधीच केले असते, तर शासन आणि ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष टळला नसता आणि काही अशासकीय संघटनेच्या नेत्यांवर गुन्हेही नोंद झाले नसते. – संपादक)

आंदोलकांवर कारवाई करण्यापूर्वी विश्‍वासात न घेतल्याचा राणे यांचा शासनावर ठपका

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जे ग्रामस्थ पूर्वी प्रकल्पाला पाठिंबा देत होते, तेही आता प्रकल्पाच्या विरोधात गेले आहेत. माझ्या मतदारसंघातील या ठिकाणी पोलीस कारवाई करतांना किंवा पोलीस तैनात करतांना मला विश्‍वासात घेतले गेले नाही, याविषयी खेद वाटतो. येथील कायदा आणि सुव्यवस्था सध्या खूपच वाईट असून माझ्या मतदारसंघात कायदा आणि पोलीस ग्रामस्थांच्या विरोधात वापरणे या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला मान्य नाही. हा प्रकल्प राज्यात अन्यत्र कुठेही स्थलांतरित करावा.

आय.आय.टी. प्रकल्प फर्मागुडी आणा ! – सुदिन ढवळीकर, मगो

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाला होत असलेला विरोध पहाता हा प्रकल्प १८ जानेवारीपर्यंत मडकई मतदारसंघातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संकुलात आणावा, अशी मागणी मडकईचे मगोचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी ट्वीटद्वारे केली आहे.