भंडारा येथे नवजात शिशू केअर युनिटमध्ये शॉटसर्किटमुळे आग, १० नवजात बालकांचा मृत्यू

  • ७ बालकांना वाचवण्यात यश 

  • चौकशीचे आदेश

  • पालकांना प्रत्येकी ५ लाखांचे साहाय्य

भंडारा – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (एस्.एन्.सी.यू) ९ जानेवारीला रात्री २ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे १० नवजात बालकांचा मृत्यू झाला असून या घटनेत ७ नवजात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. मृत्युमुखी पडलेली बालके एक ते तीन मासांची होती. नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला.

या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशीही चर्चा केली असून त्यांनाही अन्वेषणाचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, भंडार्‍याची घटना अतिशय दुर्दैवी असून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल. या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल, तसेच मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या पालकांना राज्य शासनाच्या वतीने ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्यात येईल.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘आऊटबॉर्न युनिट’मधून रात्री २ वाजता अचानक धूर निघत होता. कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने हे पाहून लगेच रुग्णालयातील अधिकार्‍यांना सांगितले. त्यानंतर अग्नीशमन दल घटनास्थळी पोचून रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या साहाय्याने बचावकार्य चालू करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे. आपण अनमोल लहान जीव गमावले असल्याचे म्हणत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेविषयी खेदजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी असून या मागे कुणाचा हलगर्जीपणा आहे का ? हे पडताळले पाहिजे. राज्यात इतर ठिकाणी अशा घटना होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. आमदार भोंडेकर म्हणाले की, रुग्णालयातील कामगांराचा हलगर्जीपणा आहे. ४-५ वर्षांपूर्वी हे रुग्णालय झाले आहे. इतक्या अल्प कालावधीत शॉर्ट सर्कीटसारखी घटना कशी घडते ? त्यामुळे या विभागाची निर्मिती करतांना जे अभियंते आणि ठेकेदार होते, त्यांच्यावरही कारवाई करावी.

यातून ग्रामीण रुग्णालयांच्या व्यवस्थेतील दोष आणि कमतरता पुढे आल्या आहेत. चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

सर्व रुग्णालयांचे तात्काळ परीक्षण करण्याचे निर्देश – अजित पवार, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर नोंद घेतली आहे. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयांतील शिशू केअर युनिटचे तातडीने परीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

ही घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.