संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेने सल्ला देऊ नये ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

अशोक चव्हाण

मुंबई – शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने महाराष्ट्रापुरता आघाडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेसेनेने सल्ला देऊ नये, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले. २६ डिसेंबर या दिवशीच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वावरून काँग्रेसच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षरित्या टीका करून शरद पवार यांनी नेतृत्व करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला उत्तर दिले आहे.

या वेळी अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘आम्ही शरद पवार यांचा आदर करतो. ते देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार यांच्याविषयी काही बोलणे मला योग्य वाटत नाही. आपण संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व करणार असल्याच्या वृत्ताचा स्वत: शरद पवार यांनीच नकार दिला आहे.

शिवसेना ही संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटकपक्ष नाही. त्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व कुणी करावे याचा सल्ला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटकपक्षांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, हे एकमताने मान्य केलेले आहे. सोनिया गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अन्य पर्यायाचा प्रश्नच उद्भवत नाही.’’