७ महिलांसह ३७ जणांची टोळी अटकेत
|
पुणे – शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणारी टोळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. शिवाजीनगरसह वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ७ गुन्हे नोंद करत ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात ७ महिलांचाही समावेश आहे. या टोळीने आतापर्यंत २५ सहस्रांपेक्षा अधिक आरोपींना जामीन मिळवून दिला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा आणि पॉस्को यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे सिद्ध करण्याच्या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
आसिफ ताहीर शेख, मोहसीन बाबू सय्यद, रशीद अब्दुल सय्यद, अमीर मुलाणी आणि अन्य दोघांना एका गुन्ह्यात अटक केले आहे, तर अन्य एका गुन्ह्यात ९ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे. या आरोपींकडून बनावट आधारकार्ड, वेतन स्लिप, रेशनकार्ड, सातबारा उतारा, बनावट स्टँप, छायाचित्र, वेगवेगळ्या आस्थपनांची ओळखपत्रे अशी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही टोळी शिवाजीनगर, लष्कर, खडकी, वडगाव मावळसह विविध न्यायालयांत कागदपत्रे सादर करून आरोपींना जामीन मिळवून देते. सध्या तरी या चार ते पाच टोळ्या अशा पद्धतीने काम करत असल्याचे समोर आले आहे. या टोळींचा मुख्य सुत्रधार कोण आहे, याचा शोध चालू आहे.