यज्ञनगरी शिवपुरीच्या उत्पादनांना देश-विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी !

शिवपुरी परिसरातील महिला उत्पादने बनवतांना

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – विश्‍व फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे यज्ञनगरी शिवपुरी येथे वेद आणि आयुर्वेद यांचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिवपुरी परिसरातील एकूण ३२ महिलांना उदबत्ती उत्पादन करणार्‍या उद्योगात वर्षभर रोजगार उपलब्ध होत आहे. शिवपुरी येथे महिलांच्या माध्यमातून विविध प्रकारांतून ८० हून अधिक सुगंधी उदबत्तींची निर्मिती होत आहे. या सर्व नैसर्गिक प्रकारच्या उदबत्ती वाजवी दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही उत्पादने विदेशातही मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. यात प्रामुख्याने अमेरिका, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादने जात आहेत.

विश्‍व ग्लोबल या प्रकल्पाअंतर्गत शरीर आणि मन यांसाठी लाभदायी असणार्‍या उत्पादनांचे निर्माण आणि ती उत्पादने विश्‍वभर सहजपणे मिळावीत यासाठी शिवपुरी ही संस्था मागील ४० वर्षांपासून काम करत आहे. ही उत्पादने आता घरपोच पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवपुरीचे अग्निहोत्र आणि योग प्रसाराचे कार्य जगभर पोचत आहे ! – डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, अध्यक्ष, शिवपुरी (अक्कलकोट)

डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, अध्यक्ष, शिवपुरी (अक्कलकोट)

शिवपुरीचे अग्निहोत्र आणि योग प्रसाराचे कार्य जगभर मोठ्या जोमाने होत आहे. स्थानिक महिलांना या उदबत्ती उद्योगातून रोजगार मिळत आहे. ही सर्व उत्पादने आपले जीवन आरोग्यपूर्ण, सुखी आणि तेजस्वी करण्यासाठी साहाय्य करतात.