(रिंगरोड म्हणजे बाह्य वळण रस्ता)
पुणे – सोलापूर रस्ता ते पुणे-बेंगळूरूच्या दरम्यानच्या ३१ कि.मी. लांबीच्या प्रस्तावित रिंगरोडच्या कामासाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने) मागवलेल्या निविदांची मुदत संपुष्टात आली आहे. ३ टप्प्यांच्या या कामासाठी ८ आस्थापनांनी मुदतीत निविदा भरल्या असून त्यांची छाननी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’कडून रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम असे रिंगरोडचे २ भाग करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्व भागातील रिंगरोड ५ तालुक्यांतून जातो. त्यामध्ये हवेली तालुक्याचाही समावेश आहे. या भागातील रिंगरोडसाठी आतापर्यंत ७० टक्के भूमीचे भूसंपादन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एन्.एच्.आय.ने) पुणे ते औरंगाबाद यामध्ये ‘ग्रीन कॅरिडोअर’चे काम हाती घेतले आहे. हा प्रस्तावित रस्ता आणि रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे सोलापूर ते पुणे-बेंगळूर रस्त्याच्या दरम्यानच्या ३१ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असे यापूर्वी ठरले होते. त्यामुळे ३१ कि.मी. लांबीच्या रस्त्याचा भाग वगळून उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निविदा मागवल्या होत्या; परंतु प्राधिकरणाने मध्यंतरी निर्णयात पालट करत या रस्त्याचे काम पुन्हा महामंडळानेच करावे, असे सांगत तो रस्ता पुन्हा ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’कडे वर्ग केला. त्यामुळे रिंगरोडचे काम १२ टप्प्यांत होणार आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या निविदा या ठरवलेल्या रकमेपेक्षा ४० ते ४५ टक्के जादा दराने आल्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या आहेत.