भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी !
पुणे – सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. आता निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी देशमुख यांना क्लीन चिट दिली नसल्याचा खुलासा केला आहे. यावरून देशमुख निर्दोष नाहीत, हेच सिद्ध होते. त्यामुळे १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात देशमुख सोडून दुसरे कुणी वाटेकरी होते का ? याची चौकशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या वतीने करावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मिडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपाध्ये बोलत होते.
उपाध्ये म्हणाले की, सचिन वाझे यांनी १०० कोटींच्या वसुलीचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा आयोग नेमला होता. या अहवालातून आपण आपले निर्दोषत्व सिद्ध करू, असे त्यांना वाटत होते; मात्र न्यायमूर्ती चांदीवाल यांनी खुलासा केला की, त्यांनी अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही. चांदीवाल यांनी स्पष्टीकरण दिल्याने वाझे प्रकरणाला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणात ‘देशमुख सोडून उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षातील आणखी दुसरे कुणी वाटेकरी होते का, याची चौकशी व्हावी’, अशी मागणी करत चांदीवाल आयोगाच्या या गौप्यस्फोटानंतर ‘आता देशमुख क्षमा मागणार का ?’ असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.