राष्ट्रपतींच्या भेटीमुळे रहित होणारा मंदिरातील विवाहसोहळा राष्ट्रपतींच्या प्रेमळ आश्वासनानंतर ठरल्याप्रमाणे मंदिरातच झाला !
मडगाव – गोवा मुक्तीदिन सोहळ्यासाठी आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वेर्णा येथील श्री महालसा मंदिराला सपत्नीक भेट देऊन देवीकडे सर्वांच्या उन्नतीसाठी प्रार्थना केली. पुरोहितांनी पारंपरिक गार्हाणे घालून राष्ट्रविकासाची मागणी केली. देवस्थानचे अध्यक्ष कमलाक्ष नाईक यांनी या वेळी राष्ट्रपतींना मंदिराविषयी माहिती दिली, तसेच मानचिन्ह भेट दिले. या कार्यक्रमाला त्यांच्यासमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. सावंत आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा गोव्यातील दौरा आणि त्यांची महालसा मंदिर भेट ही एका कुटुंबाला फारच चिंतेची त्याचसमवेत आनंददायीही घडली.
राष्ट्रपतींच्या गोवा दौर्यामध्ये अचानक वेर्णा येथील श्री महालसा मंदिराची भेट ठरली. राष्ट्रपतींच्या मंदिर भेटीमुळे मंदिर व्यवस्थापक आणि गोवा प्रशासन यांची धांदल उडाली होती. प्रशासकीय अधिकार्यांनी राजशिष्टाचारानुसार (प्रोटोकॉलनुसार) विवाहसोहळा इतर ठिकाणी आयोजित करण्याची विनंती आयोजकांना केली. कोरोनामुळे आधीच लांबणीवर पडलेला विवाहसोहळा मोजक्याच पाहुण्यांसमवेत महालसा मंदिराच्या सभागृहात ठरला होता. राष्ट्रपतींचा दौरा अचानक ठरल्यामुळे विवाहसोहळा रहित करावा लागतो कि काय, या चिंतेत वधू-वरांकडील मंडळी होती. राष्ट्रपतींना या गोष्टीची कल्पना येताच त्यांनी विवाहसोहळा व्यवस्थित आणि ठरल्या वेळी, ठरल्या ठिकाणी उरकण्याची सूचना दिली.
श्री महालसादेवीचे दर्शन झाल्यानंतर राष्ट्रपतींनी नवविवाहित जोडप्याला मंदिराच्या आवारात बोलावून आशीर्वाद आणि शुभेच्छापत्रही दिले. त्यांच्यासमवेत गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही उपस्थित होते. राष्ट्र्रपतींच्या या निर्णयाने वरपक्ष सावंत कुटुंबीय, तसेच वधूपक्ष नार्वेकर कुटुंबीय यांची चिंता दूर होऊन सर्वांच्या आनंदात भरच पडली.