महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग १३)

भाग १२ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/432895.html


३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन

३ अ. देव सर्वज्ञ असल्यामुळे साधना करतांना देवापासून काहीही लपवू नये, अगदी स्वतःचे स्वभावदोषही लपवायला नकोत !

सौ. श्‍वेता क्लार्क : श्रीमती मामी यांच्यात प्रतिमा जपण्याचा भाग अल्प असल्यामुळे कार्यशाळेत त्यांनी स्वतःच्या मनातील विचार अत्यंत मनमोकळेपणाने आणि प्रांजळपणे सांगितले. त्यांचे विचार ऐकतांना आम्हाला पुष्कळ चांगले वाटत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधनेत हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. आपण लोकांच्या मनात स्वतःची एक प्रतिमा निर्माण करतो आणि तेव्हा स्वतःमधील स्वभावदोष अन् चुका लपवण्याचा प्रयत्न करतो. आपण देवापासून काही लपवू शकतो का ? मग आपले स्वभावदोष इतरांपासून का लपवायचे ? तुम्हाला साधनेच्या या पैलूविषयी पूर्वीपासूनच ठाऊक आहे. चांगले आहे !

३ आ. ईश्‍वरप्राप्तीची तळमळ टिकून रहावी, यासाठी साधकांनी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अथवा सातत्याने भावावस्थेत रहाणे आवश्यक असणे

श्री. गणपति : प्रत्येक परिस्थितीत माझ्यात ईश्‍वरप्राप्तीची तळमळ जागृत रहाण्यासाठी मी काय प्रयत्न करू ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : स्वतःतील स्वभावदोष आणि अहं न्यून झाल्यावर मनात केवळ ईश्‍वराचेच विचार असतात. त्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी अधिकाअधिक प्रयत्न करायला हवेत अथवा भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करा. एखादा जीव भावावस्थेत असतो, त्या वेळी त्याच्या मनात इतर विचार येत नाहीत. तेव्हा त्याला ‘सर्वत्र ईश्‍वर आहे’, अशी अनुभूती येते.

३ इ. ‘एखाद्या अज्ञात गोष्टीविषयी भीती वाटणे’ या स्वभावदोषावर मात करण्यासाठी आणि शिकण्याची वृत्ती निर्माण होण्यासाठी अ २ पद्धतीने स्वयंसूचना देेणे लाभदायक !

सौ. श्‍वेता क्लार्क : सौ. प्रेमा लूझ हेर्नाडेझ यांना कार्यशाळेच्या वेळी अल्पसा आध्यात्मिक त्रास झाला. ‘नामजपादी उपाय’ या सत्रात सद्गुरु सिरियाक वाले ‘विभूती कशी फुंकरायची ?’, याचे प्रात्यक्षिक करून दाखवत होते. ते पाहून प्रेमा यांच्या मनात ‘ते माझ्यावर विभूती फुंकरतील’, असा विचार येऊन त्या पुष्कळ घाबरल्या होत्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले : विभूतीची भीती का वाटते ? उलट तुम्हाला विभूती फुंकरल्याचा आनंद व्हायला हवा होता. तुम्हाला नामजपादी उपायांच्या सत्रात सहभागी होता आले; म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही येथे सर्व शिकायला आला आहात. ज्यांना वाईट शक्तींचा त्रास असतो, त्यांनाच अशा प्रकारची भीती वाटते. तुमच्यासाठी हा भीतीचा अनुभव काहीसा नवीन आहे. तुम्ही प्रथमच हे दृश्य पाहिले आहे. तुमची भीती मानसिक होती. चिंता करू नका.

(क्रमशः)

भाग १४ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/433508.html

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक