‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिके’चा गोदाम म्हणून वापर !

पुणे – सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे महापालिकेने ३ कोटी रुपये व्यय करून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका’ उभारली आहे. त्याचा वापर अभ्यासिका म्हणून न करता इतर साहित्य ठेवण्याचे गोदाम म्हणून केला जात आहे. त्याविषयी स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या अभ्यासिकेचे उद्घाटन वर्ष २०२१ मध्ये झाले आहे. केवळ विद्युत् जोडणी झाली नाही; म्हणून त्याचा वापर गोदाम म्हणून करण्यात येत आहे. महापालिकेने नायडू रुग्णालय कोठीतील सर्व साहित्य या ठिकाणी ठेवले आहे. याविषयी चरवड यांनी वेळोवेळी महापालिकेकडे लेखी पाठपुरावा केला; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या अभ्यासिकेमध्ये कुणी साहित्य ठेवले आहे ? काय साहित्य आहे ? याची माहिती महापालिकेतील अधिकार्‍यांना नाही. (महापालिकेचे दायित्वशून्य अधिकारी ! – संपादक)