शत्रूनेही गौरवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्वकियांकडून होणारी उपेक्षा, ही शोकांतिका ! – अपर्णा कुलकर्णी, व्याख्यात्या

पिंपरी (जिल्हा पुणे) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केवळ देशातून नव्हे, तर थेट शत्रूच्या घरात घुसून स्वातंत्र्याची लढाई लढली. इंग्लंडमधील ज्या ‘इंडिया हाऊस’मध्ये वास्तव्य करून सावरकरांनी या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिनिधित्व केले, त्याच ‘इंडिया हाऊस’च्या बाहेर आज तेथील ब्रिटीश सरकारने सावरकर यांच्या गौरवार्थ फलक लावला आहे. ज्या इंग्रज सरकारविरोधात लढण्यात सावरकर यांनी स्वत:चे आयुष्य पणाला लावले, त्या शत्रूने त्यांचा गौरव केला; मात्र दुसरीकडे ज्या देशवासियांसाठी त्यांनी हा लढा लढला, त्याच देशवासियांकडून आज त्यांची उपेक्षा होत आहे, यासारखी दुसरी शोकांतिका नाही, असे प्रतिपादन व्याख्यात्या अपर्णा कुलकर्णी यांनी केले. ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’ यांच्या वतीने आयोजित ‘श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्या’त १७ डिसेंबर या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर अपर्णा कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’चे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज उपस्थित होते.