परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
(भाग १४)
भाग १३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/433251.html
३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन
३ ई. स्वभावदोष न्यून होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला स्वयंसूचनेतील प्रसंगांत पालट करणे आवश्यक !
सौ. शरण्या देसाई : माझ्यातील एका स्वभावदोषावर मी प्रसंगानुरूप स्वयंसूचना घेत आहे; मात्र एका आठवड्यानंतर त्या एकाच प्रसंगावर स्वयंसूचना घेऊन मला पुष्कळ कंटाळा येतो. त्यामुळे मी सूचनेतील प्रसंग पालटून पुन्हा स्वयंसूचना घेते. हे योग्य आहे का ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : एक स्वभावदोष विविध प्रसंगांत प्रकट होत असतो. ‘राग येणे’ या स्वभावदोषाचे उदाहरण पाहू. एखाद्या प्रसंगात तुम्हाला तुमच्या यजमानांचा राग येईल, तर दुसर्या प्रसंगात अन्य कुणाचा तरी राग येऊ शकतो. तुम्हाला राग येण्याचे असे अनेक प्रसंग असू शकतात. एक आठवडा एका प्रसंगावर स्वयंसूचना घेतल्यावर तुम्ही या स्वयंसूचनेतील प्रसंग पालटू शकता; कारण स्वयंसूचनेच्या माध्यमातून आपण ‘राग येणे’ या स्वभावदोषावर आक्रमण करत असतो.
सौ. शरण्या देसाई : गेल्या काही मासांपासून माझा राग अनावर होतो. त्याचे प्रकटीकरण झाल्यामुळे इतर दुखावले जातात. परिणामी नाती बिघडतात. माझा राग शांत झाल्यावर ‘असे कसे झाले ?’, या विचाराने मला अपराधी वाटते; परंतु मला ते थांबवता येत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘रागाचे कारण वाईट शक्ती आहे आणि ‘अपराधी वाटणे’ ही तुमची स्वतःची भावना आहे. अशा वेळी नामजप वाढवावा, जेणेकरून तुमची भावजागृती होईल आणि वाईट शक्तींची शक्ती न्यून होईल. या प्रक्रियेला वेळ लागेल; परंतु त्यातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
सौ. शरण्या देसाई : मला राग आलेला आवडत नाही. त्यामुळे मी भावजागृतीसाठी प्रयत्न करते; मात्र तो भाव टिकून रहात नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : सर्वसाधारण व्यक्तीलाही भाव जागृत करणे कठीण असते, तर वाईट शक्तींचा त्रास असणार्याला ते कसे शक्य होईल ? स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेतही वाईट शक्ती अडथळे आणतात. सर्वसाधारण व्यक्ती किंवा साधक यांच्या तुलनेत वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकाला स्वतःच्या स्वभावदोषांवर मात करायला दुप्पट अथवा तिप्पट वेळ लागतो. काहीही असले, तरी साधनेत आज नाही, तर उद्या आपणच विजयी होणार आहोत. येत्या २ वर्षांत जगभरातील सर्व वाईट शक्तींची शक्ती न्यून होणार आहे. आपल्याला त्याचाही लाभ होईल.
सौ. शरण्या देसाई : एखाद्या प्रसंगात प्रकट होणार्या स्वभावदोषावर मी पाच वेळा स्वयंसूचना घ्यायची आणि एका आठवड्याने त्या स्वयंसूचनेतील प्रसंग पालटायचा असेच ना ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : एखाद्या प्रसंगात प्रकट होणार्या स्वभावदोषावर आठवडाभर दिवसातून ५ वेळा स्वयंसूचना घ्यायची. अशा प्रकारे तुम्हाला एक एक करून सर्व प्रसंगांवर विजय मिळवायचा आहे.
(क्रमशः)
भाग १५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/433891.html
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |