२० डिसेंबर या दिवशी आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करावयाच्या विविध प्रयत्नांपैकी काही सूत्रे जाणून घेतली. आता आपण यांपैकी उर्वरित सूत्रे आणि राग येऊ नये, यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.
(भाग ४)
लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/865329.html

८. रागावर नियंत्रण कसे मिळवावे ?
८ आ. मनाच्या स्तरावरील प्रयत्न
८ आ ७. सकारात्मक रहाणे
८ आ ७ अ. समोरच्या व्यक्तीला तिचे स्वभावदोष आणि अहं यांसह स्वीकारणे : ‘मनुष्य परिपूर्ण नसल्याने त्याच्याकडून कळत-नकळत स्वभावदोष आणि अहं यांमुळे चुका घडत असतात. ‘कुणी जाणूनबुजून चुका करत नाही’, हे समजून घेतले, तर आपण एखाद्यावर अनावश्यक रागावणार नाही. प्रत्येक वेळी सकारात्मक राहून परिस्थिती स्वीकारावी. तसेच समोरच्या व्यक्तीला त्याचे स्वभावदोष आणि अहं यांसह स्वीकारले, तर राग येण्याचे प्रमाण न्यून होते.
८ आ ७ आ. शिकण्याच्या स्थितीत रहाणे : प्रत्येक क्षणाला परिस्थिती आणि व्यक्ती काही ना काहीतरी शिकवत असतात. ‘ते शिकून घेऊन वृत्ती आणि कृती यांमध्ये सुधारणा केली, तर प्रगती होणार आहे’, असा सकारात्मक विचार करून परिस्थिती, ती व्यक्ती आणि भगवंत यांच्याप्रती कृतज्ञ रहायला हवे.
८ इ. बुद्धीच्या स्तरावरील प्रयत्न
८ इ १. देवाने आनंदप्राप्तीसाठी निर्माण केलेल्या सृष्टीत मानवाने चांगले बोलल्यास आणि चांगले विचार केल्यास रागाला आश्रय न मिळणे : ‘जसा विचार तशी सृष्टी’, यांनुसार राग येणार्या व्यक्तीला सर्व जग वाईट दिसते; कारण रागामुळे त्याचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक शक्तींचे आवरण आलेले असते. खरेतर देवाने माणसाला आनंद मिळण्यासाठी ही सृष्टी आणि जग यांची निर्मिती केली आहे. माणसाने चांगले बोलणे आणि चांगला विचार करणे, हे वाढवल्यास त्याला आनंद मिळून त्याच्या रागाला आश्रय मिळणार नाही.
८ इ २. राग व्यक्त करण्याचे टाळून सुधारण्याची संधी देवाने दिली असल्याची मनाला जाणीव करून देणे : व्यक्तीच्या पूर्वग्रहदूषित स्वभावामुळे किंवा पूर्वजन्मातील देवाण-घेवाण हिशोबाच्या परतफेडीच्या संस्कारांमुळे तिच्याकडून क्रिया-प्रतिक्रिया रागाच्या स्वरूपात व्यक्त होत असतात. तेव्हा राग आलेल्या व्यक्तीने स्वतःच्या मनाला पुढीलप्रमाणे योग्य दृष्टीकोन द्यावा. ‘रागामुळे दोघांचीही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हानी होते. राग व्यक्त करण्याचे टाळून दोघांनाही सुधारण्याची संधी देवाने दिली आहे. त्यानुसार माझ्याकडून कृती होऊ दे’, अशी मनाला वरचेवर जाणीव करून दिल्यास राग येणे आणि रागाचे प्रकटीकरण होणे न्यून होईल.
८ ई. आध्यात्मिक उपाय
८ ई १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘गुरुकृपायोगा’नुसार अष्टांग साधना केल्याने अहंकार न्यून होणे : अहंकारामुळे राग येतो, हे आपण वर पाहिले. हा अहंकार नष्ट करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी (गुरुदेवांनी) सांगितलेली गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना करायला आरंभ केल्यावर हा अहंकार हळूहळू न्यून होतो.
८ ई २. विचार कागदावर लिहून कागद अग्नीत विसर्जन करणे : राग आल्यावर त्या प्रसंगाविषयी मनात आलेले सर्व विचार कागदावर लिहून काढावेत. त्यामुळे मन मोकळे होऊन हलके वाटते. मनावरचा ताण दूर होतो. त्यानंतर तो कागद अग्नीत विसर्जन करावा.
८ ई ३. ‘प्रीती’ हा ईश्वरी गुण वाढल्याने राग त्या प्रमाणात उणावणे : ‘मी प्रेममय अशा ईश्वराचे स्वरूप आहे. माझ्या हृदयात प्रेमाचा झरा अखंड वहात आहे’, असा भाव ठेवला, तर मी प्रत्येकाकडे प्रेमाने पहात रहाणार. त्यामुळे माझ्यावर कुणावर रागावण्याची वेळ येणार नाही. आपल्यामध्ये निरपेक्ष प्रेम म्हणजे ‘प्रीती’ हा गुण जसजसा वाढत जाईल, तसतसे आपण सर्वांवर जास्त प्रेम करू लागतो आणि आपला राग त्या प्रमाणात उणावतो.
८ ई ४. ‘प्रसंग देवाला किंवा गुरूंना सांगत आहोत’, असा भाव ठेवून कृती करणे : ‘राग आलेल्या व्यक्तीने ‘प्रसंगासंदर्भात सर्व सूत्रे देवाला किंवा आपल्या गुरूंना सांगत आहोत’, असा भाव ठेवून तशी कृती करावी. त्या वेळी भगवंत किंवा गुरुदेव त्या व्यक्तीच्या मनामध्ये सकारात्मक विचार घालतात आणि त्या व्यक्तीला संभाव्य हानीपासून वाचवून त्याचे रक्षण करतात.
८ ई ५. भगवंताला शरण जाणे आणि प्रार्थना करणे : संपूर्ण शरणागत होऊन भगवंताला आर्ततेने प्रार्थना करावी. ‘हे भगवंता, या क्रोधापासून मला त्वरित मुक्ती मिळू दे.’ प्रार्थना केल्यावर भगवंताचे साहाय्य मिळते आणि आपली क्रोधापासून लवकर मुक्तता होते.
८ ई ६. मनुष्याचे मूळ स्वरूप प्रेममय असून त्याने ईश्वरी गुणांची सातत्याने आठवण ठेवली, तर रागाचे प्रमाण न्यून होणे : ‘मी कोण आहे ? मी ईश्वराचा अंश असून ईश्वरामध्ये राग नाही. राग हा बाहेरून आलेला आहे’, हे लक्षात घ्यायला हवे. ‘माझे मूळ स्वरूप ईश्वरमय आणि प्रेममय असून त्यात रागाला स्थान नाही’, हे लक्षात आल्यावर मला राग येणार नाही. ईश्वरी गुणांची सातत्याने आठवण ठेवली, तर रागाचे प्रमाण न्यून होते.
८ ई ७. आपण कुटुंबातील किंवा अन्य व्यक्तींवर रागावतो, म्हणजे ‘ईश्वराच्या दुसर्या रूपावर आपण राग काढत असून त्याला म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरालाच दुःखी करत आहोत’, याची जाणीव जागृत ठेवली, तर आपल्याकडून इतरांवर रागावणे टाळण्याचे प्रयत्न चालू होतील.
९. राग येऊ नये, यासाठी करावयाचे अन्य प्रयत्न
९ अ . अत्तर किंवा सुगंधित फुलांचा वास घेणे : राग येण्याची चिन्हे दिसत असतील किंवा आपले मन रागाने तणावग्रस्त असेल, तेव्हा आवडत्या अत्तराचा किंवा सुगंधित फुलांचा वास घ्यावा. यामुळे मनाला वेगळ्या दिशेने वळवता येऊन प्रसन्न वाटते.
९ आ. सात्त्विक अन्न खाणे आणि सतत सकारात्मक रहाणे : सात्त्विक अन्न खाण्याने आणि दिवसभर सकारात्मक राहिल्याने आपण रागाला दूर ठेवू शकतो. त्यामुळे सात्त्विकता वाढते. तमोगुणी विचार आणि कृती होत नाही. त्यामुळे रागाचे प्रसंग उद्भवत नाहीत.
९ इ. प्राणायाम आणि ध्यान यांमुळे येणार्या सकारात्मक ऊर्जेमुळे राग येण्याची प्रक्रिया उणावणे : प्राणायाम आणि ध्यान केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती अन् वाढ होते. नकारात्मकता त्या प्रमाणात न्यून होते. सकारात्मकतेमुळे राग येण्याची प्रक्रिया आणि अन्यांकडून अपेक्षा करणे उणावते. एखाद्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्याच्यातील गुण बघण्याचा भाग होतो
९ ई. सामाजिक समस्येसंदर्भात राग येणे टाळणे : समाजामध्ये अनेक अयोग्य घटना घडत असतात. त्याचा एखाद्याला राग येऊन काही लाभ होत नाही; कारण समाजव्यवस्था सुधारणे, चुकीच्या घटना दुरुस्त करणे, हे एकट्या-दुकट्याचे काम नाही’, हे लक्षात घ्यावे; परंतु त्यासाठी तो वैध मार्गाने निषेध नोंदवू शकतो आणि प्रयत्न करू शकतो.
९ उ. आवश्यक तेवढी शांत झोप घेणे : व्यक्तीच्या अनेक गरजांपैकी ‘शांत झोप घेणे’ ही एक महत्त्वाची गरज आहे. व्यक्तीने ६ ते ७ घंटे शांतपणे झोप घेतल्यावर तिचे मन आणि शरीर आनंदी अन् उत्साही रहाते. चिडचिड होण्याची आणि राग येण्याची प्रक्रिया न्यून होते.
९ ऊ. तज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचार घेणे : एखाद्याचा स्वभाव अतिशय रागीट असेल, तर मानसोपचार तज्ञांचे मार्गदर्शन (समुपदेश) घेणे उपयुक्त होईल. त्यांनी सांगितलेली औषधे नियमित घेतल्याने किंवा सांगितलेले उपचार नियमित केल्याने राग न्यून होण्यास साहाय्य होईल.’
(समाप्त.)
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.