अधिवक्त्यांनो, जीवनात येणार्‍या तणावाच्या प्रसंगांवर मात करण्यासाठी साधना करा !

‘प्रत्येक जण मृगजळरूपी दिसणार्‍या सुखाच्या मागे धावून ते प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. ‘काही वेळेस सुख प्राप्त झाले, तरी त्याच्या मागोमाग दुःखही येते’, हे अज्ञानामुळे व्यक्तीला ठाऊक नसल्याने थोड्या दु:खामुळे ती निराश होते. हे न्यायव्यवस्थेमध्ये काम करणार्‍या अधिवक्त्यांनाही लागू आहे. अधिवक्त्यांना वकिली व्यवसाय करतांना ताण-तणावाच्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावर होतांना आपल्याला दिसून येतो. हा तणाव दूर करून जीवनात आनंद मिळवून देण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनेला पर्याय नाही. ही साधना आजच्या काळातील संजीवनीच होय.

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

१. अधिवक्त्यांच्या जीवनात येणार्‍या तणावाची काही प्रमुख कारणे

१ अ. पक्षकारांची बाजू सांभाळण्याचे दायित्व ! : अधिवक्त्यांचे जीवन हे व्यस्त आणि तणावपूर्ण असते. न्याय मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये अन्याय करणारा आणि अन्याय झालेला, असे दोन्ही पक्षकार येतात. अशा दोन्ही पक्षांची बाजू कुशलपणे मांडण्याचे काम अधिवक्ता करतो. हे सर्व करतांना अधिवक्ता पक्षकारांमध्ये स्वत:ला एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवून घेतो की, वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी विचार करण्याची ऊर्जा तो गमावून बसतो.

१ आ. व्यवसाय स्थिरस्थावर करण्याचा तणाव : प्रत्येकाला त्याच्या वडिलांकडून अथवा अन्य व्यक्तींकडून वकिली करण्याचा स्रोत मिळतोच असे नाही. व्यवसायात स्थिर होण्यासाठी प्रत्येकाला सतत प्रयत्न करावे लागतात. याशिवाय कायम अद्ययावत रहाण्यासाठी कायदेविषयक पुस्तकांचा अभ्यास करणे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या विविध न्यायनिवाड्यांचा अभ्यास करणे आदी प्रयत्न सतत करावे लागतात.

१ इ. नैतिकदृष्ट्या अयोग्य बाजू असलेल्या पक्षकाराची बाजू मांडण्याचा ताण : अधिवक्ता स्थिरस्थावर असला, तरी पक्षकार मिळणे आणि ते टिकवून ठेवणे, याचा तणाव असतो. याशिवाय पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रतिदिनी धडपड करावी लागते. अनेक वेळा नैतिकदृष्ट्या पक्षकाराची बाजू खोटी असतांनाही त्याला (खोटा) न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

१ ई. न्यायालयीन व्यवस्थेतील दोष, गलथानपणा आदींमुळेही तणाव निर्माण होतो.

२. तणावमुक्ती करण्याचे उपाय

२ अ. गुणवृद्धीसाठी प्रयत्न करणे : प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक दोष आणि अहंकार यांचे पैलू असतात. हे दोष दूर न केल्याने दिवसेंदिवस ते वाढत जातात. त्यांच्याशी लढण्यात सर्व प्रकारची ऊर्जा व्यय होते. जेव्हा व्यक्ती स्वत:तील दोष घालवून गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करते, तेव्हाच खर्‍या अर्थाने व्यक्तीचा आध्यात्मिक विकास होण्याकडे वाटचाल चालू होते. अधिवक्त्यामध्ये महत्त्वाचे काही गुण पुढीलप्रमाणे आहेत.

२ अ १. वक्तशीरपणा : वक्तशीरपणा हा सौजन्याचा गुणधर्म आहे. व्यावहारिक किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी हा गुण आपल्या अंगी असणे आवश्यक आहे.

२ अ २. प्रामाणिकपणा : प्रत्येकाला प्रामाणिक व्यक्ती किंवा प्रामाणिक अधिवक्ता आवडतो. पक्षकार अशा अधिवक्त्याकडे आकर्षित होतात. अधिवक्ता कायदातज्ञ म्हणून प्रामाणिक असणे अपेक्षित आहे. आपण आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा किंवा पारदर्शीपणा जपला पाहिजे. त्यामुळे आपल्याला समाधान मिळून ताण न्यून होतो.

२ अ ३. स्थिरता : जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहातो, त्याला कठीण परिस्थितीतही एक संधी दिसत असते. त्यामुळे स्थिर रहाण्यासाठी साधना उपयोगी ठरते.

२ अ ४. नीतीशास्त्र : नैतिक तत्त्वांचे अनुसरण करणे शिकले पाहिजे. स्वत: मृगजळाच्या मागे लागू नये आणि इतरांनाही वास्तविकतेचे भान करून दिले पाहिजे.

२ आ. सत्कर्म करणे : सत्कर्म केल्याने आपले पुण्य वृद्धींगत होते. यासाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपल्यातील दोष दूर झाले की, तणावमुक्तीच नाही, तर परमानंदस्वरूप जीवन जगता येते.

२ इ. मन सशक्त होण्यासाठी साधना करावी ! : आध्यात्मिक साधना केल्यास अल्प वेळेत एकाग्रता साधता येते. जगात विविध ठिकाणी या संदर्भातील संशोधन स्वीकारले गेले आहे. विशेषतः देवतेचा नामजप केल्यास एकाग्रता वाढण्यास साहाय्य होते. ज्याप्रमाणे व्यायामामुळे शरिराची क्षमता वाढते, त्याप्रमाणे साधना हा मनाचा एक व्यायामच आहे. त्यामुळे मन आणि बुद्धी सशक्त होऊन व्यक्ती ताणतणाव सहन करण्यास सक्षम होते

२ इ १. साधना कोणती करावी ? : व्यक्तीच्या मनावर असलेले अनेक जन्मांचे वाईट संस्कार नष्ट करणे आणि त्याऐवजी स्वत:मध्ये गुणवृद्धी करणे आवश्यक आहे. यासाठी ईश्‍वराचा नामजप करणे, हा आजच्या काळातील तणावमुक्तीचा सर्वांत सोपा आणि सुलभ मार्ग आहे. प्रत्येक व्यक्तीचा जन्म विशिष्ट कुळामध्ये होणे, हे त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी परमेश्‍वराने आखलेले नियोजन असते. त्यामुळे जलद उन्नतीसाठी आपण आपल्या कुलदेवतेचा नामजप अखंड करावा. एखाद्याची कुलदेवता श्री भवानीदेवी असेल, तर त्याने ‘श्री भवानीदेव्यै नम ः ।’, असा नामजप करावा. नामजप हाच आजच्या काळातील यज्ञ आहे. कुलदेवतेच्या नामजपासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणे आवश्यक आहे. बुद्धीने समजू न शकणार्‍या किंवा विज्ञानाच्या माध्यमातून न सुटणार्‍या अडचणी पूर्वजांच्या त्रासामुळे निर्माण झालेल्या असू शकतात. त्यासाठी हा नामजप करावा. ‘शास्त्रानुसार कृती केली, तर अनुभूती नक्की येते’, हा अनेक जणांचा अनुभव आहे. आपणही ही अध्यात्माची गोडी चाखूया आणि तणावमुक्त जीवन जगण्यास साहाय्य करणार्‍या साधनेेचा प्रतिदिनच्या जीवनात अंतर्भाव करूया. त्यामुळे सर्वांच्या जीवनाचे सार्थक होईल.

२ इ. सनातन-निर्मित आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करणे : धकाधकीच्या जीवनाचा गाडा सुख-दुःखाच्या कालचक्रातून प्रतिदिन ओढावा लागतो. या ‘सुख-दुःखाच्या कालचक्राच्या पलीकडील आनंद’ आणि ‘आनंद मिळवण्यासाठी अध्यात्म’ हा विलक्षण सुवर्णयोग सनातन-निर्मित अनेक धर्मग्रंथांमध्ये साधण्यात आला आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अनेक धर्मग्रंथ संकलित केले आहेत. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी या ग्रंथांचा लाभ घेऊ शकतो.’

– गुरुचरणांच्या सेवेसाठी आतुरलेला, अधिवक्ता नीलेश आप्पासाहेब सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद (ऑगस्ट २०२०)

अधिवक्ते आणि पक्षकार यांना विनंती !

बरेचदा असे दिसून येते की, पक्षकाराने अधिवक्त्याकडे सर्व कागदपत्रे देऊनही अधिवक्ते पक्षकाराची बाजू मांडण्यास कमी पडतात किंवा जाणीवपूर्वक व्यक्तीगत स्वार्थापोटी बाजू कमकुवत ठेवतात. यात त्यांचे ज्ञान, अज्ञान आणि अनुभव या सर्वांमुळे दाव्यावर आणि खटल्यावर परिणाम होऊन पक्षकारांची बाजू कमकुवत होते. पक्षकार देखील जाणीवपूर्वक सत्य स्थिती आणि दावा अन् खटल्यासंदर्भातील माहिती आणि कागदपत्रे अधिवक्त्यांपासून लपवून ठेवतात. त्यातदेखील त्यांचा स्वार्थ असतो. या परिस्थितीत अधिवक्त्याने प्रामाणिक प्रयत्न केले, तरीदेखील त्याच्या पक्षकारांनी लपवून ठेवलेली माहिती आणि कागदपत्रांमुळे दावा किंवा खटला विरोधात गेल्याचे अनेक वेळा निदर्शनास आलेले आहे. आपल्या चुकीचे खापर अनेक पक्षकार प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ काम करणार्‍या अधिवक्त्यांवर फोडतात. त्यातदेखील अधिवक्त्यांना आर्थिक आणि मानसिक रित्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो.

असे अधिवक्ता आणि पक्षकार यांच्या स्वार्थीपणाविषयी कटू अनुभव आले असल्यास प्रकरणानिहाय कागदपत्रांसह आम्हाला कळवावेत. न्यायक्षेत्रातील त्रुटी सुधारण्यासाठी आम्हाला हे अनुभव उपयोगी पडतील.

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

पत्रव्यवहारासाठी पत्ता – ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा – गोवा, ४०३ ४०१

ई-मेल पत्ता : [email protected]

भमणभाष क्रमांक : ९५९५९८४८४४

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक