कर्नाटक येथे दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत गोहत्याबंदी विधेयक मांडले जाणार होते. या विधेयकावर मतदान घेण्यापूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी विधान परिषदेच्या सभापतीपदी बसलेल्या उपसभापतींना हाताला धरून खाली खेचले. तसेच काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात हाणामारीही केली. गोहत्याबंदी विधेयक कर्नाटक विधानसभेत काही दिवसांपूर्वी संमत झाले. या वेळीही काँग्रेस आणि जनता दल यांच्या आमदारांनी विरोध केला होता; मात्र त्यांचा विरोध मोडून काढत कायदा संमत झाला.
हे विधेयक वरिष्ठ सभागृहात सादर करतांना त्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना उपस्थित रहाण्यासाठी ‘व्हिप’ जारी केला होता. त्यामुळे काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार उपस्थित होते. काँग्रेसला या विधेयकाला विरोध करायचा असेल, तर चर्चा करू शकत होते; मात्र चर्चेचा मार्ग न चोखाळता तांत्रिक सूत्राचा आधार घेऊन गुंडगिरी करण्यात आली. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी अध्यक्षस्थानी सभापती बसलेले असतात; मात्र त्यांच्या अनुपस्थितीत हे काम उपसभापती अथवा तात्पुरते अधिकार दिलेला आमदार करू शकतो. असे असतांना काँग्रेसला गुंडगिरी करून उपसभापतींना खाली खेचण्याचे दु:साहस करण्याचा अधिकार कुणी दिला ?
गोहत्याबंदी विधेयक विधानसभेत संमत झाल्याचा राग काँग्रेसला आला, हे स्पष्ट आहे आणि त्यांना वरिष्ठ सभागृहात हे विधेयक संमत होणे नको होते. ‘गोहत्याबंदी विधेयक संमत होऊ नये’, असे वाटणार्या काँग्रेसला लाखो हिंदूंना ठार करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करावीशी मात्र वाटते. गोहत्याबंदी होणे म्हणजे काँग्रेस लांगूलचालन करत असलेल्या धर्मांधांवर अन्याय वाटतो का ? काँग्रेस एवढी का खवळते ? महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करतांनाही काँग्रेसने विरोध केला होता. गोहत्येच्या मागे मोठे अर्थकारण आहे. भारत मोठ्या प्रमाणात गोमांसाची निर्यात करणारा देश आहे. हिंदूंना पूजनीय असलेल्या आणि बहुसंख्य हिंदूंच्या देशाकडून गोमांसाची निर्यात होणे हिंदूंना लज्जास्पद आहे. भारतात असलेल्या देशी गोवंशाच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. स्वातंत्र्यापूर्वी ६०-७० कोटींहून अधिक असलेला गोवंश आता केवळ १ कोटी एवढा उरला आहे, अशी माहिती बातम्यांमधून मिळते. याचा अर्थ गोवंश हत्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनियंत्रित पद्धतीने चालू आहे. देशात १७ राज्यांमध्ये गोहत्या आणि गोमांस विक्री यांवर बंदी आहे, तरी प्रत्येक राज्यानुसार कायद्याचे आणि शिक्षेचे स्वरूप भिन्न आहे. त्यामुळे गोहत्या होत आहेच. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायींची तस्करी, गोमांसाची तस्करी चालू आहे किंवा अन्य राज्यातून गोमांस विकत घेतले जाते. हे लक्षात घेऊन केंद्रशासनाने केंद्र स्तरावरच याविषयी प्रभावी कायदा करावा आणि त्याची कार्यवाही राज्यांना बंधनकारक करावी, हिंदूंविरोधी काँग्रेसला तिची जागा दाखवून द्यावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे.