रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी सौ. योगिता चेऊलकर यांना आलेल्या अनुभूती

१. संत यज्ञस्थळी आल्यावर वातावरण थंड आणि पुष्कळ आनंददायी होणे

‘आश्रमात नवग्रह यज्ञाच्या अंतर्गत शनिदेवतेसाठी आहुती देतांना वातावरणात असह्य उष्णता जाणवत होती; परंतु संत यज्ञस्थळी आल्यावर वातावरणात अचानक पालट जाणवला. त्या वेळी थंड वार्‍याची झुळूक आली आणि आजूबाजूचे वातावरणही पुष्कळ आनंददायी झाले.

सौ. योगिता चेऊलकर

२. यज्ञविधी चालू असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा दिसणे आणि तेच विधी करत आहेत, असे जाणवणे अन् या प्रसंगातून त्या दोघी गुरुदेवांशी एकरूप झाल्याचे लक्षात येणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यज्ञातील विधी करत होत्या. दोघींकडे पहातांना क्षणभर ‘परात्पर गुरु डॉक्टरच विधी करत आहे’, असे जाणवले. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडे पाहिल्यावर मला त्यांच्या जागी परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा दिसला. या प्रसंगातून ‘दोन्ही सद्गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूप झाल्या आहेत’, असे लक्षात आले.

३. मैनेची किलबिल ऐकू येऊन तीसुद्धा आनंदाने यज्ञाच्या विधींमध्ये सहभागी झाल्याचे जाणवणे

संध्याकाळी ६.४५ ते ७.०० या वेळेत मैनेची (पक्षी) किलबिल मी कधी ऐकली नव्हती; परंतु त्या दिवशी सायंकाळी मैनेची मधुर आवाजातील किलबिल ऐकू येत होती. त्या वेळी ‘जणू तीसुद्धा आनंदाने यज्ञाच्या विधींमध्ये सहभागी झाली असून तिच्या मित्र-मैत्रिणींना त्याविषयी सांगत आहे’, असे वाटले.

४. यज्ञ संपन्न झाल्यावर आश्रमाभोवती गुलाबी रंगाची प्रभावळ दिसणे आणि ही प्रभावळ म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांची आश्रम आणि साधक यांंच्यावरील अपार प्रीतीचे प्रतीक असल्याचे जाणवणे

आणखी एक यज्ञ चालू असतांना यज्ञकुंडातून बाहेर पडणार्‍या काळ्या धुरामध्ये मला वेगवेगळ्या आकारांतील त्रासदायक शक्ती दिसत होत्या. त्यानंतर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि सर्व पुरोहित साधक यांच्या भोवती निळ्या रंगाची प्रभावळ दिसली. यज्ञ संपन्न झाल्यावर मी रस्त्यावरून भोजनकक्षाकडे जातांना मला आश्रमाभोवती गुलाबी रंगाची प्रभावळ दिसली. या प्रसंगावरून ‘परात्पर गुरु डॉक्टरांची आश्रम आणि साधक यांंवर अपार प्रीती आहे’, असे लक्षात आले.’

– सौ. योगिता चेऊलकर, रामनाथी आश्रम, गोवा. (८.५.२०१८)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक