ठाणे येथे ८५ लाख ४८ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत, तिघांना अटक

बनावट नोटांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कठोरात कठोर शासन द्यायला हवे !

ठाणे, ११ डिसेंबर (वार्ता.) – २ सहस्र रुपयांच्या बनावट चलनी नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या सचिन आगरे याला कापूरबावडी परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे २ साथीदार मन्सुर खान आणि चंद्रकांत माने यांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८५ लाख ४८ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. नोटा छापण्यासाठी वापरलेले संगणक, प्रिंटर, पेपर बंडल (रिम्स), शाई, कटर, भ्रमणभाष संच आदी सामुग्री जप्त करण्यात आली आहे. आपसात संगनमताने या नोटा छापल्याचेही या आरोपींनी मान्य केले आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.