श्रीविष्णूची आपल्यावर असलेली दृष्टी अनुभवून तशी प्रेमळ दृष्टी निर्माण करण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न !

‘भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून भगवंताने मागच्या सत्संगात सर्व साधकांना अमूल्य भेट दिली ती, म्हणजे भावदृष्टी ! भगवंताने ‘नेत्रांनी काय पहावे ?’, याविषयी साधकांना भावसत्संगाच्या माध्यमातून योग्य दिशा दिली. साधकांना भावदृष्टी मिळाल्याने सर्वत्र भगवंतच दिसू लागला.

कमललोचन अशा श्रीविष्णूची कृपामय दृष्टी आपल्यावर अखंड असते. श्रीविष्णूचे नेत्र, म्हणजे जणू प्रीती आणि करुणा यांचा सागरच आहे. त्या नेत्रांमधून वात्सल्यभाव, प्रेम, प्रीती, करुणा, दया हे सर्वकाही अनुभवायला येते. श्रीविष्णूचे आपल्याकडे अखंड लक्ष आहे. त्यामुळेच आपल्याला भावदृष्टी प्राप्त झाली. आपले नेत्र आपल्याला आपले वाटतात. त्यामुळेच आपण त्या नेत्रांचा हवा तसा वापर करतो. त्या नेत्रांनी, त्या दृष्टीने आपण इतरांचे दोष पहातो. त्यांच्याविषयी पूर्वग्रह बाळगतो. आपल्याला इतरांचे दोष आणि चुका आधी दिसतात; परंतु भगवंताला अपेक्षित आहे की, त्याने या सृष्टीमध्ये जी सुंदरता निर्माण केली आहे, प्रत्येक जिवात जे विविध गुण निर्माण केले आहेत, त्यामुळे प्रसन्न होऊन आपण आपल्या साधनेसाठी त्याचा लाभ घ्यायचा आहे. त्या भावदृष्टीने सर्वत्र म्हणजे प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि चराचर सृष्टी यांकडे पहाण्याचे ध्येय भावसत्संगातून सर्वांना दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

कु. वैष्णवी वेसणेकर                                                     कु. योगिता पालन

१. सौ. ज्योती सबरद, मुंबई 

१ अ. ‘घरातील सर्वांचे गुण बघायचे ठरवल्यावर स्वतःत पालट होऊन ‘त्यांच्यासाठी किती आणि काय करू ?’, असे वाटणे : पूर्वी मला घरातील व्यक्तींच्या संदर्भात तीव्र अपेक्षा असायच्या. आता ‘यजमान आणि मुली यांचे गुणच बघायचे’, असे ठरवल्यावर माझ्यातच पालट होऊ लागला. आधी मला त्यांच्याविषयी प्रेम वाटत नव्हते; पण आता ‘त्यांच्यासाठी किती आणि काय करू ?’, असे वाटायला लागले. सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यासाठी यजमानांचा पूर्ण विरोध होता; पण आता त्यांचा विरोध ५० टक्के इतक्या प्रमाणात उणावला आहे.

१ आ. अपेक्षेमुळे होणारी चिडचिड बंद होणे आणि यजमानांचा विरोध काही टक्क्यांनी न्यून होऊन घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणे अन् समष्टी सेवेतही सहसाधिकेचे गुण बघता येऊन स्वतःच्या चुका स्वीकारता येणे : मला असलेल्या अपेक्षांमुळे होणारी माझी आणि मुलींची चिडचिड बंद झाली. यजमानांचा विरोध काही प्रमाणात उणावला. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आता एकमेकांना समजून घेणे होते. समष्टी सेवेत काही साधकाविषयी मला पूर्वग्रह होता. तेव्हा देवानेच भावनेत्र दिल्यामुळे मला साधकांचे गुण बघता आले. त्यामुळे ‘माझ्या चुका कुठे होतात ?’, ते स्वीकारता आले.

२. सौ. क्षिप्रा जुवेकर, जळगाव

२ अ. ‘सगळे आपलेच असून सर्वांमध्ये काहीच अंतर नाही’, असे भगवंताने दाखवणे : एकदा मला स्वतःच्या प्रगतीचे विचार पुष्कळ येत होते. तेव्हा सेवाकेंद्रात साधकांच्या प्रगतीचा फलक लावला होता. तेव्हा भगवंताने सांगितले, ‘आपल्या सर्वांमध्ये गुरुदेवच आहेत. आपण त्यांच्याच कृपेने जन्माला आलो आहोत. बाहेरचे आवरण काही असेल, म्हणजे शरीर, प्रकृती, दोष वेगवेगळे आहेत; पण अंतर्मनात गुरुदेव आहेत आणि आपण जेव्हा त्यांच्या चरणांवर विलीन होऊ, तेव्हा अंशाचे काही अस्तित्वच रहाणार नाही. ‘क्षिप्राचा अंश कोणता आणि समोरच्या साधकाचा अंश कोणता ?’, हे गुरुचरणी पोचण्याविना कळणारच नाही. त्यामुळे आता ज्या साधकांची प्रगती होत आहे, ती मीच आहे आणि माझ्या अंतरात मीच आहे.’ देवाने मला एकदम वेगळा अनुभव दिला. ‘सगळे आपलेच आहेत. सर्वांमध्ये काहीच अंतर नाही’, असे भगवंताने मला दाखवले.

२ आ. सहसाधकांमध्ये गुरुदेवांना बघायला प्रारंभ केल्यावर साधकांचे गुण लक्षात येऊन त्यांच्याविषयी प्रेम वाटणे अन् ‘स्वतः कशी अयोग्य वागत होते ?’, हे देवाने दाखवणे : ‘जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आलेल्या धर्मप्रेमींमध्येही गुरुदेव आहेत’, हे देवाने मला भावदृष्टीने दाखवले. मला साधकांच्या संदर्भात पूर्वग्रह असायचा; पण नंतर माझ्या लक्षात आले, ‘चूक माझीच होती. माझ्यातील स्वभावदोषांमुळे मी त्यांचे दोष बघत होते.’ मी साधकांमध्ये गुरुदेवांना बघायला आरंभ केल्यावर त्यांचे गुण माझ्या लक्षात येऊ लागले आणि मला त्यांच्याविषयी प्रेम वाटायला लागले. ‘मीच कशी अयोग्य वागत होते ?’, ते देवाने दाखवले.

३. सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ अ. ‘सारणीत चुका लिहितांना कर्तेपणा जागृत असल्याने सारणी आणि शरीर यांच्यात जडपणा जाणवतो अन् ‘देवाने चुका लक्षात आणून दिल्या’, असा भाव असल्यास हलकेपणा जाणवतो’, असे सूक्ष्मातील परम पूज्यांनी सांगणे : भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे मी मनातील विचार वहीत लिहायला लागले. मी वहीत विचार लिहिल्यावर मला वही पुष्कळ जड वाटायला लागली. माझे मन आणि शरीर पुष्कळ जड वाटायला लागले. मी याविषयी सूक्ष्मातून परम पूज्यांना विचारले, ‘असे कसे झाले ? लिखाण केल्यावर हलकेपणा जाणवायला हवा.’ तेव्हा परम पूज्यांनी सूक्ष्मातून सांगितले, ‘आपण वहीत चुका लिहिल्यावर कुठेतरी कर्तेपणा असतो. ‘मला आज एवढ्या चुका मिळाल्या. आज मी एवढ्या चुका लिहिल्या. मी लिहिल्या’, असे कर्तेपणाचे विचार असतात; म्हणून ती वही आणि शरीर जड भासते.’ ‘हे सर्व देवानेच करून घेतले, देवानेच या चुका माझ्या लक्षात आणून दिल्या,’ असे वाटल्यास हलकेपणा जाणवतो.’ ‘परम पूज्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून क्षणाक्षणाला देव किती साहाय्य करत आहे !’, याची भगवंताने प्रचीतीही दिली.

४. कु. गुरुदास घोडके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४ अ. पूर्वी सहसाधकांमधील स्वभावदोष बघितल्यावर त्यांच्याशी रागाने बोलणे आणि नंतर त्यांच्यातील गुण पहाण्याचा प्रयत्न केल्यावर हलकेपणा जाणवून सहसाधकांचे पुष्कळ गुण लक्षात येणे : आधी सेवा करतांना माझ्याकडून सहसाधकांतील स्वभावदोष बघितले जायचे. त्यामुळे माझे त्यांच्याशी उद्धट आणि रागाने बोलणे व्हायचे. मागच्या २ सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी साधकांमधील गुण पहाण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. त्यामुळे मला हलकेपणा जाणवत आहे. मला साधकांविषयी प्रतिक्रिया येण्याचे प्रमाणही न्यून झाले. साधकांतील गुण पाहून मला वाटले, ‘उगाच मी इतके दिवस त्यांच्यातील दोष पहात होतो.’ मला त्यांचे पुष्कळ गुण लक्षात आले.

५. सौ. इंदिरा भट, विश्रामबाग, सांगली

५ अ. आधी वृत्ती बहिर्मुख असल्याने स्वयंपाक करतांना बाहेर कुणी बोलत असेल, त्याकडे लक्ष जाणे आणि त्या वेळी नामजपाकडे लक्ष नसणे, नंतर प.पू. गुरुदेवांचे नेत्र समोर आल्याने नामजप चांगला होणे : आधी माझी बहिर्मुख वृत्ती होती. मी स्वयंपाक करतांना ‘बाहेर कुणी बोलत असेल, तर ते काय बोलतात ?’, याकडे माझे लक्ष असायचे. त्या वेळी माझे नामजपाकडे लक्ष नसायचे. आता स्वयंपाक करतांना माझ्यासमोर प.पू. गुरुदेवांचे नेत्र येतात. आता माझा नामजपही चांगला व्हायला लागला.

५ आ. साधकांच्या चुका दिसल्यावर त्या ‘त्यांना कशा सांगू ?’, असे वाटणे, नंतर ‘परम पूज्यांनी कसे तत्त्वनिष्ठतेने सांगितले आहे, तसे सांगायचे’, असे चिंतन होऊन साधकांना चुका सांगू लागल्यावर आनंद मिळणे : आधी ‘साधकांच्या चुका दिसल्यावर त्या त्यांना कसे सांगू ?’, असे मला वाटायचे. आता मला साधकांच्या चुका लक्षात आल्यावर प.पू. गुरुदेवांचे नयन दिसतात. ‘प.पू. गुरुदेवांनी कसे तत्त्वनिष्ठतेने आपल्याला सांगितले आहे, तसे आपल्याला सांगायचे आहे. साधकांना लागेल असे बोलायचे नाही. त्यांना ते स्वीकारता आले पाहिजे’, असे चिंतन होऊन साधकांना चुका सांगू लागल्यावर मला आनंद मिळाला.

– कु. वैष्णवी वेसणेकर आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०१९)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक