दवर्ली येथे सशस्त्र रेल्वे पोलीस दलाची नेमणूक
मडगाव, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – रेल्वेमार्ग दुपरीकरणाच्या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जात असूनही या विरोधाला डावलून रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम चालू झाले आहे. दवर्ली, मडगाव येथे रेल्वे फाटकाजवळील बांधकाम तोडून या कामाला प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोवा पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाचे बिहार विभागातील सशस्त्र पोलीस यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
रेल्वे संरक्षण दलाच्या बिहार विभागातील पोलीस गोव्यात बुधवारी आल्यानंतर त्यांना त्वरित दवर्ली आणि सांद-जोस-द-आरियल या ठिकाणी रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम चालू असलेल्या ठिकाणी नेमण्यात आले आहे. याविषयी वरिष्ठ रेल्वे अधिकारी म्हणाले, ‘‘दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुब्बळ्ळी विभागातील पोलीस दलाला गोव्यात पाचारण करण्यात आले आहे. हल्लीच रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला विरोध झालेल्या ठिकाणी या पोलिसांना नेमण्यात येणार आहे.’’ प्राप्त माहितीनुसार गोवा पोलिसांऐवजी सशस्त्र रेल्वे पोलीस दलाची नेमणूक केल्याने शासन रेल्वेमार्ग दुपदरीकरण काम चालूच ठेवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.