अत्यावश्यक सेवांच्या वाहनांतून प्रशासन आणि पोलीस यांची दृष्टी चुकवून आपल्या मूळ गावी जाणारे कह्यात

ठाणे, २८ मार्च (वार्ता.) – देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदी घोषित केलेली असतांना पोलीस आणि प्रशासन यांची दृष्टी चुकवून आपल्या मूळ गावी जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या दुधाच्या टँकरमधून राजस्थान येथे जाणार्‍या १० ते १५ नागरिकांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथे पोलिसांनी कह्यात घेतले आहे, तर मीरारोड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एका मालवाहू ट्रकमधून कर्नाटक येथे आपल्या मूळ गावी जाणार्‍या काही लोकांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ट्रकचालकावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांमधून माणसांची वाहतूक करणार्‍या वाहनचालकांवर कडक कारवाई झाल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक) अन्य एका घटनेत महामार्गावरून पायी गावी जाणार्‍या तिघांना विरारजवळ एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.