स्थलांतर करणार्‍या परप्रांतीय कामगारांची सर्व व्यवस्था करा ! – केंद्र सरकार

 

नवी देहली – देशभरात दळणवळण बंदीमुळे विविध शहरांतूून सहस्रोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार आपापल्या गावाकडे पायीच निघाले आहेत. याची गंभीर नोंद घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांची सर्व व्यवस्था करण्याचा आदेश दिला. गावाकडे निघालेले कामगार आणि निराधार नागरिक यांची रहाणे, खाणे-पिणे, कपडे देणे, औषधोपचार करणे आदी व्यवस्था करावी, असे या आदेशात म्हटले आहे. यासह विस्थापित कामगार आणि बेघर नागरिक यांच्या साहाय्यासाठी ‘आपत्कालीन साहाय्यता निधी’चा उपयोग करावा, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

दळणवळण बंदीमुळे देशभरात सहस्रो कामगार गावाला जाण्यासाठी रस्त्यांवर

नवी देहली – देशभरात दळणवळण बंदीमुळे काम बंद झाल्याने सहस्रोंच्या संख्येने स्थलांतर झालेले कामगार आपापल्या गावी परतण्यासाठी पायीच निघाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. देहली आणि नोएडा येथील सहस्रो कामगार बिहारकडे जाण्यास कोणताही पर्याय नसल्याने पायीच निघाले आहेत. यांपैकी बहुतेक कामगारांकडील खाण्या-पिण्याच्या वस्तू संपलेल्या असून त्यांना पैशांचीही चणचण भासत आहे. त्यातच बस आणि रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे ते सर्वजण मोठ्या संख्येने एकत्रित जात आहेत. याचसमवेत महाराष्ट्रातून काही कामगार गुजरातकडे मोठ्या संख्येने पायी जात आहेत. यामुळे अनेक कामगारांना पाय सुजण्यासारख्या शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

गाझियाबादमध्ये खासगी बससेवा चालू असून सहस्रोंच्या संख्येने कामगार गावी जाण्यासाठी गर्दी करून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना दरवाजाने आत शिरता येत नसल्याने काही जण खिडकीतूनही बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. या वेळी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा नियम पाळणे तर दूरच; पण सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

स्थलांतर करणार्‍या नागरिकांना अन्न-पाणी द्या ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्री

जे नागरिक सध्या स्वतःच्या गावाकडे पायी जायला निघाले आहेत, त्यांना पथकर वसुली नाक्यांवर अन्न-पाणी द्यावे, असा आदेश केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी ‘राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणा’चे अध्यक्ष आणि पथकर वसुली करणारी आस्थापने यांना यांनी ट्वीट करून दिला.