पणजी – शासनाने उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे सिद्ध केली आहेत. परराज्यातून गोव्यात आलेल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाने केले आहे. या केंद्रांजवळ रहाणार्या नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, असे शासकीय सूत्रांनी कळवले आहे.
गोव्यातील कोरोनाबाधित रुग्ण अनेकांत मिसळल्याचे उघड
गोव्यात २६ मार्च या दिवशी ३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. या रुग्णांचे विलगीकरण होण्याअगोदर त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. यासंबंधी पुढील धोका टाळण्यासाठी गोमंतकियांनी घरातच रहावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांत गोव्यात परतलेले काही सुशिक्षित लोक त्यांचा प्रवासाचा इतिहास शासनाला सांगू इच्छित नाहीत.’’ (एखाद्या गुन्हेगाराकडून माहिती वदवून घेतात, तशी या व्यक्तींकडून माहिती घ्यावी ! येथे संपूर्ण समाजाच्या आरोग्याचा आणि जिविताचा प्रश्न आहे ! – संपादक)
गोव्यात ‘व्हायरोलॉजी’ प्रयोगशाळा आजपासून कार्यान्वित होणार! – राणे
पणजी – कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी गोव्यात ‘व्हायरोलॉजी’ प्रयोगशाळा २८ मार्चपासून कार्यान्वित होणार आहे. या प्रयोगशाळेत सेवा बजावण्यासाठी पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेलेला आधुनिक वैद्यांचा गट ‘किट्स’सह गोव्यात पोचला आहे. गोव्यात कोरोनाबाधित नवीन रुग्ण सापडला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
विलगीकरण (क्वारंटाईन) सुविधेसाठी शासन खासगी रुग्णालये आणि हॉटेल कह्यात घेणार
पणजी – शासनाने विलगीकरण (क्वारंटाईन) सुविधेसाठी राज्यातील २ खासगी रुग्णालये कह्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी शासन उत्तर गोव्यात मिरामार येथील ‘युथ हॉस्टेल’ आणि पाटो, पणजी येथील ‘हॉटेल जिंजर’ कह्यात घेण्याच्या सिद्धतेत आहे, तसेच पर्यटन खात्याच्या अखत्यारीत येणारे निवासी प्रकल्पही या सुविधेसाठी वापरले जाणार आहेत.
दिवसभरातील महत्त्वाच्या अन्य घडामोडी
१. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी निवृत्त आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
२. आधुनिक वैद्यांना ‘ऑनलाईन’ संपर्क साधता यावा, यासाठी ‘CallDoc’ अॅप सिद्ध केले आहे.
३. गोव्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांसाठी भारतीय नौदलाच्या विमानाने देहली येथून ‘फेस मास्क’ आणले आहेत. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या गोवा विभागाने ६० सहस्र ‘फेस मास्क’ची मागणी दिली होती; मात्र हे ‘फेस मास्क’ वाहून नेणारा ट्रक संचारबंदीमुळे देहली येथे अडकून पडला होता. हे ‘फेस मास्क’ विमानाने आणण्यात आले.
४. शासनाने विदेशी नागरिकांसंबंधीची प्रकरणे हाताळण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक बॉस्को जार्ज यांची नियुक्ती केली आहे.
५. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोलवाळ कारागृहातील बंदीवानांनी त्यांना ‘पॅरोल’ वर सोडण्याचे आवाहन केले आहे.
६. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने आधुनिक वैद्यांचे विलगीकरण केल्याचे वृत्त ही एक अफवा आहे. अशा वृत्तांवर लोकांनी विश्वास ठेवू नयेे, असे आवाहन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन शिवानंद बांदेकर यांनी केले आहे.
राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
१. संचारबंदीच्या काळात औषधनिर्मिती कंपन्या चालू ठेवण्यास राज्य कार्यकारी समितीची मान्यता
२. हॉटेल केवळ आतमधील पाहुण्यांसाठी अन्नपुरवठा करू शकते.
३. बेकरी चालू करण्यास मान्यता नाही.
४. आवश्यक अन्नपुरवठा करण्यासाठी अन्ननिर्मितीपासून तिचा पुरवठा करण्यापर्यंतची केंद्रे संचारबंदीच्या काळात चालू रहातील.
५. राज्याच्या सीमांवर अडकून पडलेले ट्रक त्यांच्या पुढील प्रवासासाठी पाठवले जाऊ शकतात; मात्र यापुढे केवळ अत्यावश्यक वस्तू वाहणार्या ट्रकलाच मान्यता दिली जाईल.