दळणवळण बंदीच्या काळात कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणी यंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात बंदी नाही ! – कृषीमंत्री दादा भुसे

नाशिक – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमध्ये कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी लादलेली नाही. त्यामुळे कृषी आणि कृषीपूरक उद्योग यांच्याशी संबंधित सर्व सेवा सुरळीतपणे चालू रहाणार असून शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांनी गर्दी न करता निर्भय राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आणि शेतीपूरक उद्योग यांना दळणवळण बंदीच्या काळात येणार्‍या अडचणीच्या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे अन् पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

दादा भुसे पुढे म्हणाले की,

१. प्रत्येकाने आपली आणि देशाची काळजी घेतली पाहिजे. सध्या घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही. नागरिकांनी शासनासह समन्वय आणि शासनाला सहकार्य केल्यास कोरोनाच्या संकटाला सक्षमपणे तोंड देऊ शकतो.

२. जिल्ह्यात कलम १४४ लागू केल्यानंतर शेतीसंबंधित बियाणे आणि खते व्यवसाय, शेतीपूरक उद्योग व्यवसाय यांच्या वाहतुकीत काही अडथळे निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

३. शेतीविषयी कुठल्याही कामकाजाच्या वाहतुकीत अडथळा येणार नाही, यासंदर्भात प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर्.टी.ओ.) यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आर्.टी.ओ.ने जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करणार्‍या वाहनांना ऑनलाईन परवाने अन् ‘स्टिकर’ देण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा.