कोरोनाबाधित व्यक्तींची माहिती तत्परतेने प्रशासनास देणे, समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. यात निष्काळजीपणा किंवा मनमानीपणा करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
ठाणे, २७ मार्च (वार्ता.) – कोरोनाबाधित रुग्णाची माहिती महानगरपालिकेला न कळवणारे नौपाडा येथील खासगी चाचणी केंद्र (लॅब) ‘सील’ करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे, तर त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील अन्य ३ व्यक्तींना पडताळणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल (रिपोर्ट) अद्याप प्राप्त झाला नसल्याचे ठाणे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. कोरोनाबाधित व्यक्तीने त्याची पडताळणी वरील चाचणी केंद्रात केली होती. या चाचणी केंद्राने रुग्णाची माहिती महानगरपालिकेला दिली नसल्याने वरील कारवाई करण्यात आली.
१. ही कोरोनाबाधित व्यक्ती अन्य कुणाच्या संपर्कात आली आहे ?, याची माहिती अद्यापही मिळू शकलेली नसल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे आहे.
२. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथे २७ मार्चपर्यंत १ सहस्र ८०० जणांची पडताळणी करण्यात आली आहे.
३. ठाणे येथे पडताळणी करण्यात आलेल्या १ सहस्र ८०० जणांमध्ये ९२७ नागरिक विदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ८७३ जणांचा त्यात समावेश आहे.
४. आतापर्यंत १ सहस्र ७५३ जणांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, तर कस्तुरबा रुग्णालयात ४४ जणांना पाठवण्यात आले आहे. त्यातील ३० जणांना पडताळणी करून सोडण्यात आले आहे.
५. उर्वरित १४ जणांवर उपचार चालू आहेत. यांपैकी ४ जणांना कोरोनाची लागण झाली असून अन्य जण हे संशयित आहेत. महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या विलगीकरण कक्षात १० संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.