तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

भारतामध्ये काही दशकांपूर्वीपर्यंत तांब्याच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता; मात्र त्याची स्वच्छता आणि त्यांचा जडपणा पहाता आता अन्य हलक्या धातूंचा वापर केला जात आहे. अ‍ॅल्युमिनियम आदी धातूंमुळे शरिराला अपाय होतो, असेही समोर आले आहे. त्यामुळे पूर्वीचे भारतीय किती ज्ञानी होते, हे आता वैज्ञानिकांना लक्षात येत आहे !

नवी देहली – तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

१. वर्ष २०१५ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्पटन’ने केलेल्या एका संशोधनानुसार ‘रेस्पिरेटरी वायरस’पासून (फुप्फुसांमध्ये संक्रमित होणार्‍या विषाणूंपासून) तांबे वाचवू शकतो. ‘रेस्पिरेटरी वायरस’मध्ये ‘सार्स’ (सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम) आणि ‘मर्स’ (मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) हे २ विषाणू आढळून येतात. अशा प्रकारचे विषाणू अन्य वस्तूंवर अनेक दिवस जिवंत रहातात; मात्र तांबे यांना त्वरित नष्ट करतो.

२. ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबॉयलॉजी’मध्ये प्रकाशित एका लेखानुसार ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड’मधील संशोधक रीटा कॉरवेल यांनी विविध विषाणूंचा अभ्यास केला. त्यात त्यांच्या लक्षात आले की, खुप जुने विषाणू तांब्यावर आले की, ते लगेच नष्ट होतात किंवा ते निष्क्रीय होतात. यामुळे काही जण अंघोळीसाठी तांब्याच्या टबचा वापर करतात.

३. वर्ष १९८० पूर्वी भारतात तांब्याच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता; मात्र नंतर अ‍ॅल्युमिनियम, स्टील आदी धातूंच्या भांंड्यांचा वापर होऊ लागला आणि तांब्याच्या भांड्यांचा वापर अल्प झाला. भारतात पूर्वीपासून तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. आयुर्वेेदानुसार तांब्यामध्ये विषाणूविरोधी गुण आहेत. तसेच त्याच्यामुळे रोगप्रतिकार क्षमताही वाढते.