देहली पोलिसांनी १०१ दिवसांनंतर शाहीन बागमधील तंबू हटवले !

धर्मांधांकडून पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न, १० जण कह्यात

  • हेच काम देहली पोलिसांनी आंदोलन चालू होताच करायला हवे होते. ते इतक्या दिवसांनी होणे पोलीस प्रशासन आणि सरकारी यंत्रणा यांना लज्जास्पद ! जे पोलीस कायद्याला विरोध करणार्‍या धर्मांधांना १०१ दिवस हटवू शकत नाहीत, ते देशभरात लपून बसलेल्या आतंकवाद्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई काय करणार ?
  • विदेशातील एखाद्या सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात धर्मांधांनी आंदोलन केल्यास ते इतके दिवस चालल्याचे कधी ऐकले आहे का ? असे केवळ धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या भारतातच घडू शकते !

नवी देहली – येथील शाहीन बागमध्ये मागील १०१ दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात धर्मांधांचे आंदोलन चालू होते. देहली पोलिसांनी २४ मार्च या दिवशी या आंदोलनस्थळी कारवाई केली. या वेळी पोलिसांनी शाहीन बाग परिसर मोकळा करणे आणि आंदोलनाशी संबंधित तेथील सर्व वस्तू हटवणे, यांसाठी क्रेनचे साहाय्य घेतले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च या दिवशी दळणवळण बंदी (लॉकडाऊन) घोषित करण्यात आली होती; मात्र तरीही शाहीन बागमध्ये धर्मांध आंदोलन करतच होते. आता कोरोनामुळे संपूर्ण देहलीमध्ये कलम १४४ लागू करण्यासह दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. या वेळी काही धर्मांधांनी पोलिसांना शाहीन बागेत अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगीही पोलिसांनी त्यांना समजावून सांगत दूर करण्याचा प्रयत्न केला; पण ते ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी १० धर्मांधांना कह्यात घेतले, अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली.

या वेळी पोलिसांनी आंदोलकांनी उभारलेले सर्व तंबू, फलक आणि इतर सर्व सामान गोळा करून ते जप्त केले. येथील तंबू आणि सर्व सामान हटवण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची मोठी कुमक मागवली होती. आंदोलनासाठी उभारलेले तंबू हटवण्यात आल्याने रस्ते मोकळे झाले आहेत.