जालना येथे ट्रकची धडक बसून रुग्णालयातून पळून जाणारा कोरोनाबाधित रुग्ण ठार !

येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेले रुग्ण राजू गायकवाड (वय ४८ वर्षे) सामान्य रुग्णालयातून कुणालाही न सांगता बाहेर पडले. ते रस्त्यावरून जात असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मराठा आरक्षण आणि कोरोनाची स्थिती यांसाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

मराठा समाजाचे आरक्षण आणि कोरोनाची स्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. या दोन्ही सूत्रांसाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या नेरूळ औद्योगिक वसाहतीतील आस्थापनांवर दंडात्मक कारवाई !

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शिवाजीनगर औद्योगिक भागातील (नेरूळ) ३ आस्थापनांवर नेरूळ विभागाचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ६४ सहस्र इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

धंदा होत नसल्याने नगरपालिकेने १ वर्षाचे भाडे माफ करावे !

गेल्या वर्षभरापासून शहरातील एकमेव चौपाटी असलेली मोतीबाग बंद आहे. त्यामुळे तेथील व्यावसायिकांचे धंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले असतांना ‘नगरपालिकेचे भाडे कसे भरायचे ?’, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.

अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर खाते बंद !

बंगालमध्ये निवडणुकानंतर झालेल्या हिंसाचाराच्या बातम्यांविषयी कंगना यांनी ‘बंगाल व्हॉयलेन्स’ या हॅशटॅगसह ‘ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण आहे’, असे ट्वीट केले होते. यावरून त्यांचे खाते बंद केल्याचे समजते.

मराठा आरक्षण रहित केल्याचा निर्णय समाजासाठी दुर्दैवी ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रहित केले आहे. या निर्णयामुळे अन्यायग्रस्त मराठा समाजावर पुन्हा अन्यायच झाला आहे. आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मूक मोर्चे काढून मराठा समाजाने अभूतपूर्व लढा उभा केला होता……

संभाजीनगर येथे रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणार्‍या २ पॅथॉलॉजी लॅबचालकांना अटक

कोरोनाच्या आपत्काळात जनतेला लुटणार्‍यांना कठोर शासन करणे आवश्यक आहे, तरच इतरांवर जरब बसेल !

पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीतील धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहरातील कोरोनामुळे झालेले मृत्यू तसेच नैसर्गिक मृत्यू यांमुळे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मृतदेह मोठ्या प्रमाणात येत आहेत. मृतदेहांवर विद्युत् दाहिनी, गॅस दाहिनी समवेत पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे परिसरात धुराचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका पुष्पा टिमकर यांचे यजमान शिरीष टिमकर (६२ वर्ष) यांचे ३ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, १ मुलगा, सून, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. सनातन परिवार टिमकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

माहेश्‍वरी समाजातील डॉक्टर दांपत्याने केला लातूर येथील गोशाळेत विवाह 

शहरातील माहेश्‍वरी समाजातील डॉ. भाग्यश्री झंवर आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डॉ. सचिन चांडक यांचा विवाह येथील श्री गुरु गणेश जैन, गोशाळेत करण्यात आला. या विवाह सोहळ्यात गोशाळेत गायींना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली.