पुणे – अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथील मंदिरामध्ये चतुर्थीनिमित्त महाआरती करण्यात आली. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत रांगेत अनुमाने ५० सहस्र भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. ‘श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने देवाला नैवेद्य दाखवून भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आली. संकष्टी चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरास, विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता, तसेच सोन्याचे अलंकारही श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. येणार्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.
कीर्तनकार ह.भ.प. नितीन महाराज हाडवळे यांचे हरिकीर्तन झाले. गीताराम टेंभेकर यांनी सव्वा किलोचे चांदीचे अलंकार भेट दिले. त्यांचा देवस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला.