पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीतील धुराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुणे, ५ मे – शहरातील कोरोनामुळे झालेले मृत्यू तसेच नैसर्गिक मृत्यू यांमुळे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मृतदेह मोठ्या प्रमाणात येत आहेत. मृतदेहांवर विद्युत् दाहिनी, गॅस दाहिनी समवेत पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे परिसरात धुराचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. धुराचे प्रमाण वाढून त्याची राख परिसरातील इमारतींवर पडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांनी प्रशासनास सामाजिक माध्यमाद्वारे (फेसबूक पोस्ट) दिली. त्या फेसबूक पोस्टची नोंद घेत महापालिका प्रशासनाने चिमण्या बदलण्याविषयी तसेच सुधारणा करण्यासाठी पावले टाकत असल्याची माहिती दिली आहे. (सहस्रो कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारा विषारी धूर रोखण्यासाठी चौधरी यांनी काय कृती केली ? पुण्यात वाहनांमुळे आणि कारखान्यांमुळे झालेल्या प्रदूषणामुळे चौधरी यांनी कधी का कृती केली नाही ? कोरोना आणि अन्य मृतदेह जाळण्याविना पर्याय नाहीत. आता पारसी, ख्रिस्ती लोकही अंत्यविधीची त्यांची पारंपरीक पद्धत पालटून अग्नि विसर्जन करत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. – संपादक)

स्मशानभूमीतील चिमणीतून काळाकुट्ट धूर, तसेच राख बाहेर पडत आहे. ती राख परिसरातील नवी पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, कर्वे रोड, शास्त्री रोड भागातील इमारतींवर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या पोस्टवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नोंद घेत स्वत: अधिकार्‍यांसोबत स्मशानभूमीची पहाणी करणार असल्याची माहिती दिली. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी विद्युत् विभागाच्या अधिकारीवर्गाने केलेल्या कामाची, शहरातील जैव-वैद्यकीय कचरा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याच्या प्रक्रियेचीही माहिती दिली.