मराठा आरक्षण रहित केल्याचा निर्णय समाजासाठी दुर्दैवी ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले

भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, ५ मे (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रहित केले आहे. या निर्णयामुळे अन्यायग्रस्त मराठा समाजावर पुन्हा अन्यायच झाला आहे. आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन मूक मोर्चे काढून मराठा समाजाने अभूतपूर्व लढा उभा केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. त्यामुळे मराठा समाजाच्या सर्वच प्रयत्नांवर पाणी पडले असून मराठा आरक्षण रहित केल्याचा निर्णय हा समाजासाठी दुर्दैवी आहे. आरक्षणप्रश्‍नी एकी राहिली नाही. याचे गंभीर परिणाम आता सर्व समाजाला भोगावे लागत आहेत, असे मत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षण रहित केल्याने सातारा येथे शिवतीर्थावर निदर्शने 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रहित केल्याने राजधानी सातारा येथे मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत निदर्शने करण्यात आली. दळणवळण बंदी उठवल्यानंतर एकत्र येऊन पुढील लढ्याची दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी दिली आहे.