१६ लाख नावे मतदार सूचीतून काढली
कोलकाता (बंगाल) – भारतीय निवडणूक आयोगाला बंगालमधील ११ विधानसभा मतदारसंघात समान अनुक्रमांक असलेली २५ सहस्र मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी ७ कोटी ४० लाख नावे असलेली प्रारूप मतदार सूची घोषित केल्यानंतर काही दिवसांनी हा शोध लागला आहे. सुमारे १६ लाख नावे मतदार सूचीतून काढून टाकण्यात आली आहेत किंवा त्यात सुधारणा करण्यात आली आहे.
बोनगाव दक्षिण आणि माटीगारा-नक्षलबारी विधानसभा मतदारसंघात समान क्रमांकाची सर्वाधिक मतदार ओळखपत्रे आढळून आली आहेत. यामध्ये बोनगावची सीमा बांगलादेशाशी, तर माटीगारा-नक्षलवाडीची सीमा नेपाळशी जोडलेली आहे. मध्यग्राम, राजारहाट-गोपालपूर, कॅनिंग पूरबा, बरुईपूर पूर्वा आणि पश्चिम, कुर्सिओंग, सिलीगुडी, बोनगाव उत्तर आणि फलकाता येथेही बनावट मतदार ओळखपत्रे सापडली आहेत.
आम्ही पडताळणी करत आहोत ! – निवडणूक आयोग
आम्ही जिल्हा प्रशासनाला सर्व मतदार ओळखपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास सांगितले आहे आणि मतदार सूचीतून बनावट नावे काढून टाकण्यास सांगितले आहे. ही मानवी चूक आहे कि परदेशी लोकांना भारतीय म्हणून दाखवण्याच्या प्रयत्न आहे, हे आम्ही तपासत आहोत, असे निवडणूक आयोगाच्या अधिकार्याने स्थानिक दैनिक ‘टेलिग्राफ’ला सांगितले.
संपादकीय भूमिकानिवडणूक आयोगाला मतदार ओळखपत्र देतांना हे का लक्षात येत नाही ? आयोगाच्या कार्यपद्धतीत दोष आहे, हेच यातून लक्षात येते. अशामुळे देशाची सुरक्षाच धोक्यात येत आहे ! |