मतदान प्रक्रिया पार पडण्‍यासाठी सातारा जिल्‍हा प्रशासन सज्‍ज ! – जितेंद्र डुडी, जिल्‍हाधिकारी, सातारा

सातारा, १९ नोव्‍हेंबर (वार्ता.) – जिल्‍ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांतील १०९ उमेदवारांचे भवितव्‍य २० नोव्‍हेंबर या दिवशी मतदान यंत्रामध्‍ये बंद होणार आहे. निवडणुकीसाठी जिल्‍ह्यातील ३ सहस्र १६५ मतदान केंद्रांवर १६ सहस्र २६१ कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. मतदान प्रक्रियेमध्‍ये होणारे अपप्रकार टाळावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. निवडणूक प्रक्रियेच्‍या सिद्धतेची माहिती देण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेमध्‍ये जिल्‍हाधिकारी बोलत होते. या वेळी विविध विभागांतील प्रशासकीय अधिकारी उपस्‍थित होते.

जिल्‍हाधिकारी डुडी पुढे म्‍हणाले, ‘‘जिल्‍ह्यात मद्य आणि पैसे वाटपाविषयी १३ कोटी २१ लाख ८४ सहस्र २३६ रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्‍यात आला आहे. जिल्‍ह्यातील १०० मतदान केंद्रे ही बांबू लागवड, कोयना प्रकल्‍प, कास पठार, स्‍त्री शिक्षण, महिला बचत गट अशा विशिष्‍ट संकल्‍पनेवर आधारीत आहेत. आतापर्यंत जिल्‍हा प्रशासनाकडे आचारसंहिता भंगाच्‍या १०७ तक्रारी प्राप्‍त झाल्‍या होत्‍या. त्‍या सर्व निकाली काढण्‍यात आल्‍या आहेत. जिल्‍ह्यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍था टिकून रहाण्‍यासाठी ३ सहस्र ९७ पोलीस कॉन्‍स्‍टेबल, तसेच २ सहस्र ९४० होमगार्ड यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. केंद्रीय निमलष्‍करी दलाच्‍या ८ तुकड्या आणि राज्‍य राखीव पोलीस दलाची १ तुकडी नियुक्‍त करण्‍यात आली आहे. प्रत्‍यक्ष मतदानाच्‍या दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडण्‍यासाठी एकूण ४३६ क्षेत्रीय अधिकारी, ३ सहस्र ९५६ केंद्राध्‍यक्ष आणि ११ सहस्र ८६९ इतर कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. या सर्व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्‍यात आले आहे.’’