कोल्हापूर – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पडण्यासाठी निवडणूक विभागाकडून ३ सहस्र ४५२ मतदान केंद्रांपैकी २ सहस्र ९० केंद्रांवर ‘वेबकास्टींग’द्वारे ‘कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर चालू असलेल्या प्रत्येक प्रक्रियेवर जिल्हास्तरावरून लक्ष ठेवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर विविध घटनांच्या तक्रारी येत असतात. त्यांची पहाणी करण्यासाठी, त्यांची निश्चिती करण्यासाठी या कॅमेरांचे साहाय्य घेतले जाणार आहे. मुख्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी या सनियंत्रण कक्षाची वेळोवेळी येऊन कामकाजाविषयी पहाणी करत आहेत.
‘चक्रीका अॅप’चाही पारदर्शकतेसाठी उपयोग !
मतदान कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या ‘चक्रीका अॅप’मुळे कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रावर वेळेत पोचला नसेल किंवा काही अनुचित प्रकार अथवा घटना घडत असेल, तर ते या ‘अॅप’च्या माध्यमातून त्वरित कळणार आहे. यामुळे प्रशासनाला उपाययोजना करणे सोपे होणार आहे. ‘चक्रीका अॅप’मुळे कर्मचार्यांचे नेमके ठिकाण निवडणूक आयोगाला कळते. या ‘अॅप’मुळे मतदान केंद्रात गोंधळ झाल्यास ते प्रशासनाला तातडीने समजणार आहे.