आळंदीत कार्तिकी वारीच्‍या दर्शनबारीसाठी भूमी अधिग्रहण करण्‍याचा आदेश !

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदीत ४ ते ५ लाख वारकरी कार्तिकी वारीत आळंदीत सहभागी होतात

आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदीत ४ ते ५ लाख वारकरी कार्तिकी वारीत आळंदीत सहभागी होतात. २३ नोव्‍हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत कार्तिकी वारी सोहळा आहे. येणार्‍या वारकर्‍यांसाठी एकाच ठिकाणी शहरात दर्शनबारीसाठी मोठी आणि सुसज्‍ज जागा उपलब्‍ध नाही. यामुळे काही वर्षे शिक्षणसम्राट डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्‍या इंद्रायणी काठच्‍या जागेत तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात जागेचे अधिग्रहण करून दर्शनमंडप उभा केला जातो. याबाबतची मागणी आळंदी नगर परिषद, दिघी पोलीस ठाणे आणि अपर तहसीलदार पिंपरी-चिंचवड यांनी लेखी स्‍वरूपात केली होती. त्‍यामुळे दर्शनाच्‍या वेळी चेंगराचेंगरीसारख्‍या दुर्घटना घडू नयेत, यासाठी आळंदीतील कार्तिकी वारीच्‍या दर्शनबारीसाठी इंद्रायणीकाठी शिक्षण संस्‍थेच्‍या खासगी जागेचे अधिग्रहण करण्‍याचा आदेश हवेली प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी काढला आहे. आपत्ती व्‍यवस्‍थापन म्‍हणून हा आदेश काढण्‍यात आला असून २० ते ३० नोव्‍हेंबर या काळात ही जागा अधिग्रहित केली जाणार आहे.