दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या यात्रेस प्रारंभ : आज यात्रेचा मुख्य दिवस !

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात गुलाल आणि खोबर्‍याच्या वाट्यांची उधळण

जोतिबा देवाची करण्यात आलेली अलंकृत पूजा

कोल्हापूर, ११ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या यात्रेस ११ एप्रिलपासून प्रारंभ झाला. सहस्रो भाविक यात्रेसाठी येण्यास प्रारंभ झाला असून मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर येण्यास प्रारंभ झाला आहे. यात्रेसाठी २ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त असून १२ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात पहाटे ५ ते ६ शासकीय महाअभिषेक पूजा, महावस्त्र आणि अलंकृत पूजा, दुपारी १२ वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘सासनकाठी यात्रा’ प्रारंभ होते.

भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शन मंडपातील ४ मजले दर्शनासाठी वापरण्यात येणार आहेत. उन्हाचा तडाखा पहाता मंडपात पंखे बसवण्यात आले आहेत. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात गुलाल आणि खोबर्‍याच्या वाट्यांची उधळण होणार असून त्यासाठी प्रशासनही सज्ज आहे.