धर्मादाय रुग्णालयांनी ‘धर्मादाय’ नावाचा फलक दर्शनी भागात लावावा ! – महिला आयोगाच्या अध्यक्षांची माहिती

जनतेला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी असणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कुणाचा अंकुश नसणे दुर्दैवी !

मुंबई – सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे ‘धर्मादाय’ असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत. यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी ‘एक्स’वर ही पोस्ट करत माहिती दिली.

१. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय आहे. असे असूनही तनिषा भिसे यांना येथे साहाय्य न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे.

२. अनेक रुग्णालये धर्मादाय असूनही त्याची माहिती देत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना साहाय्य मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकालाही चांगले उपचार मिळावेत, यासाठी असलेला धर्मादाय रुग्णालयाचा हेतूच साध्य होत नाही.

३. ही सर्व सूत्रे लक्षात घेऊन धर्मादाय रुग्णालयांच्या दर्शनी भागांत फलक लावावा आणि त्यानुसार असलेल्या सुविधा अन् नियमावली यांची माहितीही लावावी, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने धर्मादाय विभागाच्या आयुक्तांना दिले होते.

४. धर्मादाय सहआयुक्तांच्या विधी आणि न्याय विभागाने असे फलक लावण्यात आले असल्याचे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही रुग्णालयाकडून फलकप्रसिद्धी करण्याची पूर्तता राहिली असल्यास त्याची कारवाई करून त्रुटी दूर करण्यासाठी निर्देशित केले असल्याचे कळवले आहे.

५. सामान्य नागरिकांना धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या; पण तसा उल्लेख केलेला नसल्याचे किंवा फलक लावलेला नसल्याचे आढळल्यास किंवा नियमावलीप्रमाणे साहाय्य न मिळाल्यास ते राज्य महिला आयोगाकडे किंवा शासनाकडे त्वरित तक्रार करू शकतात, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

हिंदु विधीज्ञ परिषदेकडूनही लढा

धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना विविध सुविधा पुरवल्या जातात; मात्र त्याविषयी या रुग्णालयांकडून माहिती दिली जात नाही. त्यामुळे गरीब रुग्णांची असुविधा होते. यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेकडूनही शासन दरबारी निवेदने देऊन, तसेच जनतेमध्ये जागृती करून लढा दिला जात आहे.

संपादकीय भूमिका :

वास्तविक हा नियम आहे. त्यामुळे पुन्हा सूचना देण्यापेक्षा जी धर्मादाय रुग्णालये याचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !