
नगर – सामाजिक समरसता हा प्रभु श्रीरामांच्या सामाजिक धर्मकार्याचा मूलाधार होता, हे वास्तव लक्षात घेतल्यास प्रभु श्रीरामांनी साधलेल्या सामाजिक समरसतेनेच भारत शक्तीशाली होईल, असा ठाम विश्वास प्रवचनकार ह.भ.प. मिलिंद चवंडके यांनी व्यक्त केला. विश्व हिंदु परिषदेने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त भिंगारमधील ब्राह्मण गल्ली येथील श्री एकबोटे महाराज श्रीराम मंदिरात आयोजित केलेल्या प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.
मंदिरातील श्रीराम पंचायतन पूजा करून दीपप्रज्वलनाने प्रवचनाचा शुभारंभ करण्यात आला. दुर्गावाहिनीच्या जिल्हा संयोजिका सौ. जयश्री पोटे यांनी स्वागत करतांना प्रास्ताविकात विश्व हिंदु परिषदेच्या विविधांगी कार्याची माहिती दिली.
ह.भ.प. चवंडके म्हणाले की, भगवान श्रीकृष्णानी गीतेमध्ये सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा विनाश आणि धर्माची संस्थापना ही आपल्या अवतारकार्याची ३ कारणे सांगितली. प्रभु श्रीरामांच्या अवतार कार्याचीही हीच ३ कारणे होती. प्रत्येक मनुष्यात जो आत्मा आहे, तो एकच आहे. मग भेदभाव कशाला ? या विचारामधून तत्कालीन लोकरूढी बाजूला सारत श्रीरामांनी सामाजिक समरसता साधली. सामाजिक समरसतेचे त्यांचे वैश्विक कार्य आजही अखिल विश्वाला प्रभावित करत असून विश्व आजही प्रभु श्रीरामांना समजून घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
सीतामाईंनी राज्यवैभवाचा क्षणात त्याग करत पतीसमवेत वनवासाला जाणे पसंत केले, हे आजच्या युवतींनी गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक आहे. महानगरातील नोकरी आणि गलेलट्ठ पॅकेजपेक्षा पत्नीधर्म, कौटुंबिक सौख्य महत्त्वाचे ! लक्ष्मण आणि भरत यांनी आपल्या मोठ्या भावाच्या चरणांशी आपले सर्वस्व कसे समर्पण करावे ? हे दाखवून दिले. त्यांचा हा त्याग लक्षात घेतला, तर घरा-घरातील भाऊबंदकीचे तंटे क्षणात मिटतील.
श्रीरामांनी कुटुंबव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी उचललेली पावले आपल्याला कुटुंबव्यवस्था टिकवणे किती आवश्यक आहे, हेच सांगतात. संपूर्ण समाज आपला परिवार आहे, हा भाव वाढल्यास कोणत्याही व्यक्तीला संकटाचा सामना एकट्याला करावा लागणार नाही. समाजातील विभागणीनेच संकटे वाढत चालली आहेत. सामाजिक जीवनाच्या उत्थानासाठी श्रीरामांचे जीवनकार्य प्रेरणादायी आहे.
आदर्श राजपुत्र, आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श भाऊ, आदर्श सखा, आदर्श राजा अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामांची भक्ती राष्ट्रभक्ती जागवण्याचे कार्य करते. नवीन भारत निर्माण होतांना श्रीरामांचे गुण आत्मसात् करत वाटचाल करणे राष्ट्रहिताचे ठरणार आहे. यातूनच श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन होत राष्ट्राप्रती समर्पितभावाने कार्य घडेल, असे ह.भ.प. मिलिंद चवंडके यांनी रामायणातील विविध प्रसंग नेमकेपणाने मांडत सांगितले.
विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री सुनिलराव खिस्ती यांच्या नियोजनामधून संपन्न झालेल्या या प्रवचन सोहळ्यास विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अनिल जोशी, जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर, जिल्हा उपाध्यक्ष वसंतसिंग, जिल्हा मठ-मंदिर संपर्क प्रमुख श्रीकांत नांदापूरकर, अविनाश देऊळगांवकर, राजेंद्र परदेशी, अमृता कवडे, रोहिणी पोटे, जान्हवी गर्जे, संगीता राऊत, संध्या फळे यांच्यासह श्रीराम भजनी मंडळाच्या भगिनी आणि रामभक्त उपस्थित होते. अशोकराव एकबोटे व सौ.वैशाली एकबोटे यांच्या हस्ते सामुदायिक महाआरती करण्यात आली. रामरक्षा पठण व पसायदानाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.