मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून समाजात नावलौकिक असतांनाही या प्रतिमेत अडकून न रहाता हिंदु धर्म, राष्ट्र आणि समाज यांसाठी अखंडपणे कार्य करणारे अभिनेते म्हणजे श्री. शरद पोंक्षे ! एक यशस्वी अभिनेते असूनही प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्व यांच्याशी तडजोड न करणार्या विरळा व्यक्तीमत्त्वांपैकी हे एक व्यक्तीमत्त्व. आक्रमणे, धमक्या, कायदेशीर कारवाई अशा कोणत्याही दबावाला न घाबरता श्री. शरद पोंक्षे यांनी राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य अखंडपणे चालू ठेवले. त्यांच्या प्रखर, राष्ट्रनिष्ठ आणि सडेतोड विचारांमुळे मोठा युवावर्ग त्यांच्याशी जोडला आहे. युवकांमध्ये राष्ट्र आणि धर्म कार्याची ओढ निर्माण करून त्यांना कृतीप्रवण करणार्या या हिंदुत्वाच्या शिलेदाराचे कार्य या लेखाद्वारे समजून घेऊया !

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या माध्यमातून भारतात सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार्यांची सर्वांना माहिती होईल अन् त्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी पुढची दिशाही मिळेल ! – संपादक
१. जन्म आणि शिक्षण
शरद पोंक्षे यांचा जन्म मिरज येथे झाला, तिथे त्यांनी इयत्ता६ वीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले, तिथे त्यांनी भाईंदर येथील अभिनव विद्या मंदिर शाळेत शिक्षण पूर्ण केले. १२ वीनंतर त्यांनी ३ वर्षांचा ‘डिप्लोमा’ अभ्यासक्रम केला आणि त्यानंतर ‘बेस्ट’मध्ये नोकरी केली.
२. अभिनय प्रवास
त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणानंतर मुंबईतील नाटक शाळेत प्रवेश घेतला, तिथे त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली, त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटके यांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी ‘नथुराम गोडसे’ यांची भूमिका साकारली, त्यामुळे ते प्रसिद्ध झाले; पण या भूमिकेमुळे त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. त्यांनी दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांमध्ये १०० हून अधिक भूमिका केल्या आहेत.
कर्करोगाशी यशस्वी लढा देऊन समाजाचे मनोबल वाढवणारे व्यक्तीमत्त्व !

श्री. शरद पोंक्षे यांना वर्ष २०१९ मध्ये कर्करोग झाला. कर्करोग म्हटले की, मनुष्य जगण्याची आशा सोडतो; परंतु कर्करोगाचे निदान झाल्यावर १०-११ मास श्री. शरद पोंक्षे यांनी या दुर्धर रोगाशी यशस्वी लढा दिला आणि त्यातून ते सुखरूप बाहेर आले. या काळात त्यांनी स्वत:मध्ये लढाऊवृत्ती, सकारात्मकता वाढवलीच; मात्र सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे त्यांनी समाजाला प्रेरणा दिली. संकटातून शिकणारे समाजात आपणाला पहायला मिळतात; मात्र त्यातून समाजाला दिशा देणारे आणि त्यातूनही राष्ट्रकार्यासाठी समाजाला प्रेरित करणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे श्री. शरद पोंक्षे होय ! ‘लढाई ही कोणतीही असो, ती प्रथम मानसिकतेवर लढली जाते. ज्या देशात हिमायलाएवढी उत्तुंग व्यक्तीमत्त्व घडली, त्या देशातील नागरिकांनी कधी घाबरायलाच नको. देशातील राष्ट्रपुरुष, संत यांचा इतिहास आपल्या युवा पिढीला शिकवलाच गेला नाही. हा शिक्षणप्रणालीचा दोष आहे’, असे श्री. शरद पोंक्षे सांगतात.
३. देश-विदेशात व्याख्यानांद्वारे हिंदुत्वाचा प्रसार !
हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, अजेय बाजीराव पेशवे; भारत – काल, आज, उद्या; श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज या विषयांवर वर्ष २००० पासून देश-विदेशांमध्ये अनेक व्याख्याने घेऊन नागरिकांमधील हिंदुत्व, राष्ट्रनिष्ठा जागृत केली. त्यांच्या व्याख्यानातून देशातील लाखो युवकांपर्यंत राष्ट्रपुरुषांचे शौर्य पोचले. देशासाठी काही तरी कार्य करण्याची भावना निर्माण झाली.
देशातील लाखो युवकांपर्यंत वस्तूनिष्ठ इतिहास पोचवण्यासाठी जिवाची तमा न बाळगता कार्य करणारे श्री. शरद पोंक्षे !

१. धमक्यांना भीक न घालता गांधींचे खरे स्वरूप उघड करणार्या नाट्याचे १ सहस्र २०० प्रयोग केले !
मोहनदास गांधी यांचा हिंदु समाजाविषयी असलेला दुटप्पीपणा, तसेच नथुराम गोडसे यांचा प्रखर राष्ट्रवाद समाजापर्यंत पोचवण्यासाठी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, हे नाटक सादर केले. सत्य आणि अहिंसा तत्त्वे मानणार्या गांधीवाद्यांनी हे नाटक हिंसेच्या मार्गाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हाच गांधींच्या पोकळ अहिंसावादाचा पराभव होता. बस जाळणे, चालू नाटकात कलाकारांना स्टेजवर मारायला येणे, जातीवाचक गलिच्छ शिव्या देणे, पत्नीला फोन करून मारण्याच्या धमक्या देणे आदी हिंसक कृत्यांना न घाबरता श्री. शरद पोंक्षे आणि त्यांच्या सहकार्यांनी २५ वर्षांत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे १ सहस्र २०० प्रयोग सादर केले. या नाटकाला विरोध होऊ लागल्याने न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी नाटकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही नाटकाची बस जाळणे, धमक्या अशा विरोधाला झुगारून नाटकाचे प्रयोग चालूच होते. महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असतांना ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक होऊ नये, यासाठी प्रचंड दबाव असतांना श्री. शरद पोंक्षे यांनी नेटाने या नाटकाचे प्रयोग राज्यभर केले.
नथुराम गोडसे यांचे प्रखर आणि ओजस्वी विचार व्यक्त करणारे व्यक्तीमत्त्वही तसेच प्रखर राष्ट्रनिष्ठ असणे आवश्यक होते. ही प्रखरता श्री. शरद पोंक्षे यांनी या नाटकातून व्यक्त केली, त्याला तोड नाही. यामुळे देशातील लाखो युवकांपर्यंत वस्तूनिष्ठ इतिहास तर पोचलाच; परंतु ते राष्ट्रकार्यासाठी प्रेरितही झाले. कला आणि प्रखर राष्ट्रप्रेम यांचा श्री. शरद पोंक्षे यांच्यातील विलक्षण संगम सर्वच कलाकारांसाठी आदर्श आहे.
२. प्रचारमाध्यमांद्वारे राष्ट्र आणि धर्म प्रसार !
सामाजिक माध्यमांद्वारे प्रभावीपणे राष्ट्र आणि धर्म कार्याचा प्रचार करण्यासाठी श्री. शरद पोंक्षे यांनी तंत्रज्ञान अन् त्यामधील बारकावे आत्मसात् केले. यानंतर त्यांनी ‘राष्ट्राय स्वाहा’ हे स्वत:चे ‘यू ट्यूब चॅनेल’ सिद्ध करून हिंदु धर्मावरील विविध आघात, अपप्रचार यांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून हिंदु धर्म आणि राष्ट्रवाद यांचा प्रभावी प्रचार ते करत आहेत.
३. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना साहाय्य !
हिंदुत्वाचा प्रसार करतांना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना श्री. शरद पोंक्षे यांनी वेळोवेळी अर्थसाहाय्य केले. चित्रपटसृष्टीत काम करत ते हिंदुत्वाच्या प्रसारकार्यासाठी वेळ देऊन समाजकार्यामध्येही नेहमीच कृतीशील राहिले आहेत. असंख्य गरीब हिंदूंना आर्थिक आणि वैद्यकीय साहाय्य देऊन समाजकार्यातही सहभाग घेत आहेत. कर्करोगाने पीडित रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी त्यांचे समुपदेशन करतात. याचा लाभ अनेक कॅन्सरग्रस्तांना झाला आहे.