सिमकार्डमध्ये वापरले जाणारे ‘चिपसेट’ चीनमधून आल्याचे उघड झाल्यानंतर निर्णय !
नवी देहली – भारत सरकार भ्रमणभाषमध्ये वापरले जाणारे जुने सिमकार्ड पालटण्याचा विचार करत आहे. काही सिमकार्डमध्ये वापरले जाणारे ‘चिपसेट’ चीनमधून आल्याचे ‘सायबर सुरक्षा एजन्सी’ने केलेल्या तपासणीत उघड झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक (एन्.सी.एस्.सी.) आणि गृह मंत्रालय यांनी संयुक्तपणे हे अन्वेषण केले आहे. सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने विविध पैलूंचा आढावा घेत आहे.
१. ‘एन्.सी.एस्.सी.’ने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) यांसारख्या देशातील आघाडीच्या ‘टेलिकॉम ऑपरेटर्स’चे वरिष्ठ अधिकारी, तसेच दूरसंचार मंत्रालयाचे प्रतिनिधी यांच्यासमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत सिमकार्ड पुरवठा प्रक्रियेतील त्रुटी आणि जुने सिमकार्ड पालटण्याचे सूत्र यांवर चर्चा करण्यात आली.
२. भारताने ‘हुआवेई’ आणि ‘झेडटीई’ यांसारख्या चिनी उपकरण उत्पादकांवर बंदी घातली आहे.
३. आता राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने देशात दूरसंचार उपकरणांची आयात, विक्री आणि वापर करण्यापूर्वी त्यांची सक्तीने चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेद्वारे भारतात वापरली जाणारी सर्व दूरसंचार उपकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, कामगिरी अन् गुणवत्ता मानकांची पूर्तता सुनिश्चित होईल.
४. साधारणपणे दूरसंचार आस्थापने प्रमाणित विक्रेत्यांकडून सिमकार्ड खरेदी करतात. हे विक्रेते व्हिएतनाम किंवा तैवानमधील विश्वसनीय स्रोतांकडून चिप्स खरेदी करतात; परंतु काही विक्रेत्यांनी विश्वसनीय स्रोत प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी वापरलेल्या चिप्स चीनमधून आयात केल्याचे उघड झाले आहे.