संतप्त ग्रामस्थांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना १० घंटे रोखून धरल्यानंतर हत्ती पकड मोहीम राबवण्याचा वन विभागाचा आदेश

मोर्ले, दोडामार्ग येथे हत्तीच्या आक्रमणात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

दोडामार्ग – तालुक्यातील मोर्ले येथे ८ एप्रिल या दिवशी हत्तीच्या आक्रमणात लक्ष्मण यशवंत गवस या वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हत्तींच्या उपद्रवाच्या संदर्भात अनेक निवेदने दिली, तसेच उपोषणे केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत हत्ती पकडण्याची मोहीम राबवण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही आणि मृत्यू झालेल्या गवस यांच्या वारसांना तातडीने साहाय्य दिले जात नाही, तोपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही अन् कुणाला येथून घेऊन जाऊ देणार नाही’, असे सांगत गावात आलेले प्रातांधिकारी, तहसीलदार, वन अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना १० घंटे रोखून धरले. अखेर वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘हत्ती पकडण्याची मोहीम हाती घेण्यात येईल’, असे लेखी आश्वासन दिले, तसेच गवस यांच्या वारसांना तातडीचे अर्थसाहाय्य देऊन उर्वरित साहाय्य लवकरच देण्यात येईल, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

सहनशीलता संपल्याने ग्रामस्थ आक्रमक

दोडामार्ग आणि परिसरात हत्तींची समस्या गेल्या २० वर्षांहून अधिक काळ आहे. प्रारंभी दोडामार्गमध्ये असलेले हत्ती सावंतवाडी, कुडाळ मार्गे जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीपर्यंत पोचले होते. त्यानंतर पुन्हा हे हत्ती दोडामार्गमध्ये स्थिरावले. पावसाळ्यात अन्यत्र जाऊन पावसाळा संपला की, ते पुन्हा दोडामार्गमध्ये येत असत. या कालावधीत जीवित आणि शेती, बागायती यांसह वित्त हानी मोठ्या प्रमाणात केली. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करण्याच्या सातत्याच्या मागणीकडे सरकार आणि प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याने हत्तींनी आक्रमण करण्याच्या घटना ५ वेळा घडल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले; मात्र ६ व्या वेळी एका शेतकर्‍याला जीव गमवावा लागला. त्यामुळे ग्रामस्थांची सहनशीलता संपली आणि त्यांनी अधिकार्‍यांचा रस्ता रोखून धरून आंदोलन केले.

तातडीचे साहाय्य !

या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रांताधिकार्‍यांसह सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी १० घंटे मोर्लेत अडकून पडले. त्यामुळे प्रशासनाला जाग येऊन हत्ती हटवण्याचा निर्णय तातडीने घेत असल्याचे प्रशासनाला घोषित करावे लागले. गवस यांच्या वारसाला वनविभागाकडून १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, तसेच उर्वरित १५ लाख रुपये लवकरच देण्यात येतील. या खेरीज त्यांचा मुलगा विनय हा दिव्यांग असल्याने त्याला सरकारी नोकरी मिळावी, यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल, असे आश्वासन उपवनसंरक्षक एस्. नवकिशोर रेड्डी यांनी या वेळी ग्रामस्थांना दिले.

प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा आदेश

दोडामार्ग तालुक्यातील हत्तीला बंदिस्त करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. याकरिता मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर यांना संबंधित हत्तीला बंदिस्त करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. हत्तीला जेरबंद करण्याची प्रक्रिया करताना त्याला  कमीत कमी इजा होईल, याची दक्षता पथकाने घ्यावी. हा आदेश ३० जून २०२५ पर्यंत वैध राहील. संबंधित हत्तीला प्रशिशित हत्तीच्या साहाय्याने बेशुद्ध करून पकडायचे आणि तज्ञांच्या सल्ल्याने हत्तीच्या पुनर्वसनाची योग्य ती व्यवस्था करावी, असा आदेश नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम्. श्रीनिवासराव यांनी ८ एप्रिल या दिवशी काढला आहे.

ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर प्रक्रिया रेंगाळली

मुख्य वनजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम्. श्रीनिवास राव यांनी हत्ती पकड मोहीमेविषयी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ७ आणि ८ मार्च या दिवशी सरपंच सेवा संघ, दोडामार्ग यांच्यासह शेतकरी अन् ग्रामस्थ यांनी उपोषण केले होते. त्या वेळी उपोषणकर्त्यांना आश्वासन देण्यात आले होते, तसेच या अनुषंगाने २० मार्च २०२५ या दिवशी पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या बैठकीत हत्तींना पकडून अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने दोडामार्ग येथील हत्ती हटवण्यासाठी मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर; उप वनसंरक्षक सावंतवाडी यांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचा अर्थ २० मार्चपासून ८ एप्रिलपर्यंतच्या कालावधीत याची कार्यवाही का होऊ शकली नाही, हा प्रश्न निर्माण होतो. ती कार्यवाही उचित वेळेत झाली, असती, तर एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला नसता.

संपादकीय भूमिका

शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यानंतर जागे होणारे प्रशासन ! सरकारने यातील उत्तरदायी अधिकार्‍यांना कारागृहात टाकले पाहिजे, तरच यापुढे अशी असंवेदनशीलता कुणी दाखवणार नाही !