
वृंदावन (उत्तरप्रदेश) – येथील बांके बिहारी महाराज मंदिरात भाविकांनी दान दिलेले पैसे मोजतांना ते चोरणार्या कॅनरा बँकेच्या अभिनव सक्सेना नावाच्या अधिकार्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो मथुरा येथील डॅम्पियर नगर शाखेत काम करतो. त्याने गेल्या ३ दिवसांत पैसे चोरी केल्याची स्वीकृती दिली. तसेच त्याच्याकडून ९ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. बँकेने सक्सेना याला निलंबित केले असून त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी चालू केली.
मंदिर परिसरात १६ दानपेट्या आहेत. या पेट्यांमध्ये जमा झालेले पैसे प्रत्येक महिन्याला एक किंवा दोनदा मोजले जातात आणि मंदिर ट्रस्टच्या बँक खात्यात जमा केले जातात. ज्या बँकेच्या खात्यात पैसे जमा केले जातात, त्या बँकेच्या २ कर्मचार्यांना पैसे मोजण्यासाठी मंदिराकडून बोलावण्यात येते.