संपादकीय : राष्ट्रघाताकडून आत्मघाताकडे !

प्रतीकात्मक छायाचित्र

६ एप्रिल या दिवशी होत असलेल्या श्रीरामनवमीच्या उत्सवाच्या कालावधीत बंगालमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे हिंसक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. हावडा येथून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने ‘अंजनी पुत्र सेने’कडून काढण्यात येणार्‍या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून पोलिसांनी अनुमती नाकारली. ‘अंजनी पुत्र सेने’ने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केल्यावर न्यायालयाने या मिरवणुकीला सशर्त अनुमती दिली आहे. वर्ष २०२४ मध्येही हावडा येथे पोलिसांनी मिरवणुकीला अनुमती नाकारली होती. त्या वेळीही न्यायालयाच्या अनुमतीनंतर हावडा येथील श्रीरामनवमीची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीला १५ वर्षांची परंपरा आहे; मात्र या कालावधीत २ वेळा झालेल्या दंगलीमुळे पोलीस या मिरवणुकीला अनुमती नाकारत आहेत. दक्षिण बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुप्रतिम सरकार यांनी श्रीरामनवमीच्या नावाखाली राज्यात अशांतता पसरवण्याचा कट करण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाल्याचे म्हटले. यामुळे बंगालमधील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रहित करून संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून श्रीरामनवमीच्या उत्सवावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. गृहयुद्धाच्या स्थितीप्रमाणे बंगालमध्ये तणावाची स्थिती असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. हे सर्व पहाता श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करणे, म्हणजे जणूकाही मोठा गुन्हा असल्याप्रमाणे भासवण्यात येत आहे. ‘श्रीरामनवमीमुळे हिंसा आणि सामाजिक कलह निर्माण होतो. त्यामुळे हिंदूंनी श्रीरामनवमी साजरीच करू नये आणि पोलीस अन् प्रशासन यांना सहकार्य करावे’, अशी काहीशी ममता बॅनर्जी सरकारची मानसिकता दिसून येते. जे हिंसा करतात त्यांना अद्दल घडवणे, निर्बंध घालणे, हे पोलीस आणि प्रशासन यांचे कर्तव्यच आहे; परंतु हिंसाचार करणार्‍यांना प्रतिबंध करण्याऐवजी श्रीरामनवमीच्या उत्सवावर निर्बंध घालून हिंदूंची गळचेपी करणे, हा ममता बॅनर्जी यांचा हिंदुद्वेष आहे.

समाजहितासाठी नव्हे सत्तेसाठी !

रामनवमीच्या पूर्वसंध्येला कोलकाता येथे तैनात पोलीस

ममता बॅनर्जी यांना हिंदुत्व पटायलाच हवे, असे मुळीच नाही. भारतात विविध पंथांचे लोक रहातात. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असणे स्वाभाविक आहे; परंतु  ‘राष्ट्रीयत्वाची भावना’ ही देशाच्या एकसंधतेचे एक समान गमक आहे. त्यामध्ये मात्र कुणीही तडजोड करता कामा नये. मुख्यमंत्रीपदाचे दायित्व सांभाळतांना ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीयत्वाचा विचार करणे अपेक्षित आहे; परंतु बॅनर्जीबाईंना राष्ट्रीयत्वापेक्षा मुसलमानांच्या ‘व्होट बँके’ची काळजी अधिक दिसून येते. बंगालमधील तणावाचे कारण हेच आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेपेक्षा ममता बॅनर्जी यांना मात्र मुसलमानांची मते घेऊन सत्तेत रहाण्याची चिंता अधिक आहे. श्रीरामनवमीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी हिंदूंनी कोणते आक्षेपार्ह वर्तन केले किंवा हिंसाचार केला, तर त्यांना प्रतिबंध करणे याला कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही; मात्र श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करणार्‍या धर्मांध मुसलमानांवर वचक ठेवण्याऐवजी कायदा-सुव्यवस्थेसाठी सहकार्य करणार्‍या हिंदूंवर प्रतिबंध घालायचा हे कसले प्रशासन ? ममता यांचा हाच मुसलमानधार्जिणेपणा बंगालच्या तणावाला कारणीभूत आहे.

मतांसाठी राष्ट्रहितालाही तिलांजली !

काँग्रेसमधील बाहेर पडून स्वत:चा तृणमूल काँग्रेस पक्ष काढल्यावर काँग्रेसला मिळणारी मुसलमानांची एकगठ्ठा मते स्वत:कडे वळवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी टोकाचा मुसलमानधार्जिणेपणा चालू केला. जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, त्या सर्व ठिकाणी ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसकडून मुसलमान उमेदवार उभे केले. शरीयत कायदा, वक्फ कायदा यांना बळकटी दिली. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना अनेक सुविधा दिल्या. मुसलमानबहुल भागांमध्ये विविध सुविधांसाठी निधीची खैरात केली. मदरशांमध्ये मौलवींना वेतन चालू केले. या सर्वांचा परिणाम म्हणजे मुसलमानांची काँग्रेसला पडणारी एकगठ्ठा मते तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात पडू लागली. त्यामुळे ‘मुसलमानधार्जिणेपणा’ हेच ममता बॅनर्जी यांच्या सत्तेचे सूत्र झाले. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हिंदूंच्या मतांवर तिसर्‍यांदा निवडून आले, तर मग काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आदी पक्षांनी मुसलमानांच्या मतांसाठी राजकारण केले तर त्याच चुकीचे काय ? असे कुणाला वाटू शकते. भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस असो किंवा अन्य कोणते छोटे-मोठे राजकीय पक्ष असोत. सत्तेसाठी समाज आणि राष्ट्र हिताला बाधा येणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. ममता बॅनर्जी यांनी मात्र राष्ट्रहिताऐवजी सत्तेचा विचार केला, हा राष्ट्रघात आहे. सद्यःस्थितीत देशात बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. महाराष्ट्रातही अमली पदार्थांची तस्करी, अवैध बांधकामे, चोर्‍या आदी गुन्हेगारीत बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण अधिक आहे. या घुसखोरांकडे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड सापडली आहेत. या आधारे अनेक बांगलादेशींची नावे मतदारसूचीतही समाविष्ट होऊन बांगलादेशी घुसखोर अधिकृतरित्या देशाचे नागरिक झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असतांना मुसलमानांची मते मिळतात; म्हणून त्यांनी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली नाही. सध्या महाराष्ट्रात महायुती सरकारने बांगलादेशी घुसखोरांविरोधी चालू केलेल्या कारवायांमध्ये हे सर्व घुसखोर बंगालमधून महाराष्ट्रात येत असल्याचे निष्पन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ‘बांगलादेश आणि बंगाल सीमेवर कुंपण घालण्यासाठी बंगाल सरकार सहकार्य करत नाही. ही सीमा बांधल्यास भारतात होणारी बांगलादेशी घुसखोरी पूर्णत: रोखता येईल’, असे सांगितले. यातून ममता बॅनर्जी यांचा मुसलमानधार्जिणेपणा राष्ट्रहितापेक्षा किती वरचढ आहे, हे दिसून येते.

भारतातील बांगलादेशींची घुसखोरी बंगालमधून होत असूनही ती रोखण्यासाठी ममता बॅनर्जी सहकार्य करायला सिद्ध नाहीत. ममता बॅनर्जी यांची ही राष्ट्रघातकी वृत्ती एक दिवस आत्मघात ठरेल. मतांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या ममता बॅनर्जी यांना मुसलमान बहुसंख्य झाल्यावर सत्तेवर ठेवतील का ?

भारताचे इस्लामीकरणासाठी प्रयत्नरत असलेल्या धर्मांधांचे लांगूलचालन ममता कधीपर्यंत करणार आहेत ? ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राष्ट्रहिताचेही महत्त्व नसलेल्यांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांचे काय मूल्य असणार ? त्यामुळे ममता

बॅनर्जी कधीतरी मुसलमानधार्जिणेपणा सोडून हिंदुहिताची किंवा राष्ट्रहिताची भूमिका घेतील, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या आणि राष्ट्राच्या हिताकरता संघटित होऊन सत्तांध शासनकर्त्यांना सत्ताच्युत करून राष्ट्रहितदक्ष व्यक्तीला सत्तेत आणणे, हाच त्यावर उपाय ठरेल !