‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडदुर्ग यांचे रक्षण, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे धर्मकार्य करण्याची प्रेरणा घेणे, त्यांच्याप्रमाणे शौर्य, शक्ती आणि भक्ती निर्माण होणे, हा उद्देश समोर ठेवून मागील दोन वर्षांपासून पुणे जिल्ह्यात ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम घेतली जात आहे. पुणे येथील सिंहगडावर झालेल्या मोहिमेत अनुभवलेली गुरुकृपा आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

१. हिंदु धर्माभिमान्यांचा संघभाव आणि धर्मप्रेमींच्या संघटनासाठी सर्वांनी सातत्याने केलेले प्रयत्न यांमुळे अल्पावधीत मोहिमेचे चांगल्या प्रकारे नियोजन होणे
अ. पुणे शहरापासून साधारण १० किलोमीटर ते १०० किलोमीटर अंतरावरील ग्रामीण, तसेच शहरी भागांतील १७० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. त्यांचा उत्साह आणि तळमळ पाहून मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

आ. या धर्मप्रेमींना जोडून ठेवणार्या धर्माभिमान्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे, तसेच यापूर्वी त्यांना प्रेमभावाने जोडल्यामुळे सर्व धर्मप्रेमी ‘आपली मोहीम आहे’ या भावाने एकत्रित आले होते. धर्माभिमान्यांनी त्यांचे प्रवासाचे, प्रवासात लागणार्या गोष्टी, तसेच मोहिमेत सहभागी होण्याच्या दृष्टीने लागणारे साहित्य (स्वच्छतेचे साहित्य, डबे, पाणी, कोरडा खाऊ इत्यादी) यांचे परिपूर्ण नियोजन केले होते. ‘त्यामुळे सर्व धर्मप्रेमी अगदी आनंदाने या मोहिमेत सहभागी झाले होते’, असे माझ्या लक्षात आले.
२. मोहिमेच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपरेषेमुळे संपूर्ण मोहीम आध्यात्मिक स्तरावर होणे
२ अ. सामूहिक प्रार्थना : गडावर सर्व धर्मप्रेमी एकत्र आल्यानंतर सर्वांनी मिळून मोहीम यशस्वी होण्यासाठी, तसेच या मोहिमेतून स्वतःमध्ये शक्ती आणि भक्ती यांचा जागर होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण, आदिशक्ति भवानीमाता, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच गडावरील देवता श्री कोंढाणेश्वर आणि श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थना करून या मोहिमेला प्रारंभ केला.
२ आ. सामूहिक नामजप : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिशक्तीच्या नामस्मरणाने स्वतःमधील आध्यात्मिक बळ वाढवले होते. त्याचे स्मरण ठेवून सर्वांनी एकत्रितपणे गडावर ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा सामूहिक नामजप केला.
२ इ. मार्गदर्शन : त्यानंतर ‘धर्मकार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळाची आवश्यकता काय ? छत्रपती शिवाजी महाराज यांनी आध्यत्मिक बळावर धर्मकार्य कसे केले ?’, या विषयावर मार्गदर्शन झाले.
२ ई. रामराज्याची प्रतिज्ञा : ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती, त्याचप्रमाणे सर्व धर्मविरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत, तसेच श्रीराम आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांना स्मरून रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.
३. मोहिमेविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
अ. जोरदार घोषणांच्या वातावरणात गडावरील वातावरण पूर्णपणे उत्साही झाले होते. ‘सर्व धर्मप्रेमींच्या मनातही शौर्य आणि शक्ती यांचा जागर होत आहे, त्याच समवेत भगवंताच्या स्मरणामुळे भक्तीभावही जागृत होत आहे’, असे मला अनुभवता आले.
आ. ‘सर्व धर्मविरांमध्ये शौर्य आणि शक्ती यांचा जागर होत असतांना एक प्रकारची अंतर्मुखताही निर्माण होत आहे’, असेही मला अनुभवता आले.
४. गड मोहिमेचे नियोजन करत असतांना येणार्या काही अडचणी केवळ संतांना कळवल्याने दूर होऊन पूर्ण मोहीम यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे पार पडणे
४ अ. मोहिमेत अडचणी आल्याने शरणागतीने प्रार्थना केल्यावर देवाने कर्तेपणा नष्ट करण्यासाठी अडचणी निर्माण केल्याची जाणीव होणे : मोहिमेच्या दिवशी रविवार असल्याने गडावर अन्य पर्यटकांचीही पुष्कळ गर्दी होती, तसेच भ्रमणभाषला संपर्क क्षेत्राची (‘रेंज’ची) अडचण आल्याने धर्मप्रेमींना ‘कोणत्या ठिकाणी एकत्रित जमायचे ?’, हा निरोप देणे अवघड झाले होते. त्यामुळे माझ्या मनावर पुष्कळ ताण आला होता. त्या वेळी मी एका ठिकाणी जाऊन शांतपणे उभी राहिले आणि गुरुदेवांना पूर्ण शरण जाऊन ‘गुरुदेव ही माझी क्षमता नाही. आता माझ्या मर्यादा संपल्या. हा सर्व समन्वय कसा करायचा ? आणि हे नियोजन कसे करायचे ? हे आता तुम्हीच सांगा. मी तुम्हाला पूर्णपणे शरण आले आहे’, अशी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर ‘देवाने माझा ‘कर्तेपणा असणे’ हा अहं नष्ट करण्यासाठीच हा प्रसंग घडवला’, हे माझ्या लक्षात येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४ आ. पू. मनीषाताई पाठक यांनी अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करताच भ्रमणभाषला आलेली अडचण दूर होणे : प्रार्थना केल्यानंतर स्थानिक व्यक्तीला ‘संपर्क क्षेत्र (रेंज) कोणत्या ठिकाणी असेल ?’, असे विचारल्यावर त्याने दाखवलेल्या जागेवर जाऊन सर्वांना भ्रमणभाषवर संदेश पाठवले. त्या वेळी ‘त्या व्यक्तीला विचारण्याची बुद्धी गुरुदेवांनीच दिली’, असे माझ्या लक्षात आले. आलेल्या अडचणी पूज्य मनीषाताईंना (सनातन संस्थेच्या १२३ व्या समष्टी संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांना) भ्रमणभाषवर कळवल्या. पूज्य ताईंनी ‘अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केल्यावर काही क्षणातच भ्रमणभाष संपर्क क्षेत्रात (‘रेंज’मध्ये) आला. त्यानंतर राहिलेल्या सर्व धर्मप्रेमींना संपर्क करता आला. नंतर मोहिमेमध्ये कोणतीही अडचण आली नाही.
केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे आणि पूज्य मनीषाताईंच्या संकल्पामुळे ही मोहीम निर्विघ्नपणे संपन्न झाली. या मोहिमेचा सर्व धर्मप्रेमींना आध्यात्मिक स्तरावर लाभ घेता आला. याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. प्राची शिंत्रे, पुणे (२.२.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |