सातारा, ८ मार्च (वार्ता.) – पीक कर्ज व्याज परतावा देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली होती. त्यामुळे शेतकर्यांनी विद्यमान सरकारला मतदान केले; मात्र सत्तेवर आल्यानंतरही सरकारने पीक कर्ज व्याज परतावा दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा उपनिबंधक अधिकारी, तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापकांना निवेदनाद्वारे आंदोलनाची चेतावणी दिली.
बँका शेतकर्यांकडून वसूल केलेल्या पीक कर्ज व्याजाचा बिनव्याजी उपयोग करत आहेत. शेतकर्यांच्या प्रश्नाविषयी जिल्हा प्रशासन, जिल्हा बँक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे. शेतकरी पीक कर्जाचा व्याज परतावा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये व्याजाची रक्कम परत देण्यात यश मिळेल, असे आश्वासन उपनिबंधक कार्यालय, जिल्हा बँक आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकरी संघटनेला देण्यात आले.