आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘संत ज्ञानदेव यांनी ‘ज्ञानेश्वरी’साठी मराठीचे माध्यम निवडण्यामागील कारण, संत ज्ञानदेव यांनी दर्शवलेला मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठी भाषेत श्रेष्ठ असे ज्ञान देण्याचे सामर्थ्य, संत ज्ञानदेवांनी मराठीच्या सौंदर्याचा केलेला हृद्य आविष्कार, संत ज्ञानदेव यांनी मराठी भाषा रसाळ, मधुर अन् सुलभ असल्याविषयी वर्णिलेल्या ओव्या आणि संत ज्ञानदेवांनी वर्णिलेली मराठीची थोरवी’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.

८. संत ज्ञानदेवांनी मराठीचा पुरस्कार करण्याविषयी व्यक्त केलेला आत्मविश्वास
१८ व्या अध्यायाच्या उपसंहारातील खालील ओव्यांतही मराठीचा पुरस्कार, तिचे सौंदर्य, तसेच तिचे सामर्थ्य यांविषयीचा संत ज्ञानदेवांचा आत्मविश्वास व्यक्त झाला आहे.
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु ।
जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७०७
अर्थ : म्हणून जगावर व्यासांचा मोठा उपकार झाले की, श्रीकृष्णाच्या बोलण्याला त्यांनी ग्रंथाचा आकार दिला.
आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहता पाहतां ।
आणिला श्रवणपथा । मर्हाठिया ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७०८
अर्थ : आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पहाता पहाता, मी आता मराठी भाषेच्या योगाने ऐकण्याच्या मार्गाला आणला.
यालागीं आम्हां प्राकृतां । देशिकारें बंधें गीता ।
म्हणणें हें अनुचिता । कारण नोहे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७२०
अर्थ : म्हणून आमच्यासारख्या सामान्य लोकांना देशी भाषेत (मराठी भाषेत) गीता आणता येते, हे म्हणणे अयोग्य आहे, असे म्हणण्याला कारण नाही.
आतां आयती गीता जगीं । मी सांगें मर्हाठिया भंगीं ।
येथ कें विस्मयालागीं । ठावो आहे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७२९
अर्थ : ज्या गीतेचे ज्ञान मला सद्गुरूंपासून आयते (मी श्रम न करता) मिळाले आहे, ती गीता मी जगात आता मराठी भाषेद्वारे सांगतो. यात आश्चर्याला जागा कुठे आहे ?
याकारणें मियां । श्रीगीतार्थु मर्हाठिया ।
केला लोकां यया । दिठीचा विषो ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७३५
अर्थ : या कारणास्तव ही गीतेचा अर्थ ज्या लोकांना डोळ्यांनी दिसेल (आकलन होईल), असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला.
परी मर्हाठे बोलरंगें । कवळितां पैं गीतांगें ।
तैं गातयाचेनि पांगें । येकाढतां नोहे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७३६
अर्थ : परंतु माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने जेव्हा कुणी गीतेची पदे समजून घेईल, तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला, तरी माझ्या मराठी शब्दात एकदेशित्व (मर्यादितपणा) येणार नाही.
म्हणौनि गीता गावों म्हणे । तें गाणिवें होती लेणें ।
ना मोकळे तरी उणें । गीताही न आणित ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७३७
अर्थ : म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली, तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल (संस्कृतात अर्थ खुलवील) अथवा माझी नुसती टीका जर सांगितली, तर ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सारील.
सुंदर आंगीं लेणें न सुये । तैं तो मोकळा शृंगारु होये ।
ना लेइलें तरी आहे । तैसें कें उचित ? ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७३८
अर्थ : सुंदर अंगावर दागिना घातला नाही, तर तो (दागिना) मोकळा नुसता शोभतो अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला, तर तशी योग्य गोष्ट आणखी कुठे आहे ?
कां मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती ।
नातरी मानविती । अंगेंचि सडीं ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७३९
अर्थ : अथवा मोत्यांचा जसा स्वाभाविक गुण असा आहे की, ती सोन्यालाही शोभा देतात अथवा ती मोती मोकळी असली, तरी आपल्या स्वरूपाने शोभिवंत असतात.
नाना गुंफिलीं कां मोकळीं । उणीं न होती परिमळीं ।
वसंतागमींचीं वाटोळीं । मोगरीं जैसीं ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७४०
अर्थ : अथवा वसंताच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले गुंफलेली असोत किंवा मोकळी असोत, वासाच्या दृष्टीने त्यात न्यूनाधिकपणा नसतो.
तैसा गाणिवेतें मिरवी । गीतेवीणही रंगु दावीं ।
तो लाभाचा प्रबंधु ओंवी । केला मियां ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७४१
अर्थ : त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगण्यात आली, तरी शोभा आणील अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठी टीकाच सांगितली, तरी शोभा दाखवणारच. असा दोन्ही प्रकारे लाभ देणारा ओवीबद्ध काव्यग्रंथ मी केला आहे.
तेणें आबालसुबोधें । ओवीयेचेनि प्रबंधें ।
ब्रह्मरससुस्वादें । अक्षरें गुंथिलीं ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७४२
अर्थ : मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत सहज कळणार्या त्या ओवीच्या वृत्तात ब्रह्मरसाने रुचिकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत.
९. गुरुदेव रानडे यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ ‘न भूतो न भविष्यति ।’ असल्याचे सांगणे
वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथासंबंधी गुरुदेव रानडे यांनी जे विचार मांडले आहेत, ते अगदी यथार्थ आहेत. ते म्हणतात, ‘‘उपमा, भाषासौंदर्य, तत्त्वज्ञान, साक्षात्कार, भक्ती आणि अद्वैत यांची सांगड अलौकिक निरीक्षणशक्ती, अप्रतिहत कवित्वशैली, अलोट वाङ्माधुर्य या सर्व गुणांच्या संमिश्रणाने ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘असे पूर्वी कधी झाले नाही आणि यापुढे होणार नाही’, असे म्हणावयास हरकत नाही.
(संदर्भ : ‘ज्ञानेश्वर वचनामृत’ या ग्रंथातील पान ८)’
(समाप्त)